मुंबई - G7 Summit :जी-7 शिखर परिषदेच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी संपूर्ण जगाचे डोळे इटलीतील फासानो शहरावर लागले होते. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी शुक्रवारी जी7 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर सेल्फी काढला. आता सोशल मीडियावर जॉर्जिया मेलोनी आणि पंतप्रधान मोदी हे चर्चेत आले आहेत. यादरम्यान मोदी यांचे इतर जागतिक नेत्यांच्या भेटीगाठींचे अनेक खास क्षण समोर आले आहेत. मेलोनी आणि पंतप्रधान मोदी यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकजण मीम्स बनवून काहीजण खिल्ली उडवताना दिसत आहेत. इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्या ऑफिशियल अकाउंटवर #melodi असा हॅशटॅग त्यांनी वापरला आहे. 13 ते 15 जून दरम्यान इटलीमध्ये जी-7 शिखर परिषद पार पडत आहे.
पंतप्रधान मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांनी काढला सेल्फी :व्हायरल झालेल्या फोटोमध्ये पंतप्रधान मोदी आणि जॉर्जिया मेलोनी हे सेल्फी फोटोमध्ये हसताना दिसत आहेत. दरम्यान मेलोनी आणि पंतप्रधान मोदी यांचे अनेकदा फोटो व्हायरल झालेले आहेत. यावर अनेकांनी दोघांमध्ये काय नात असल्याचं, सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर करून याबद्दल विचारलं आहे. पंतप्रधान मोदी इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्या निमंत्रणावरून जी-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी गेले. यानंतर मोदींनी एक्सवर आपल्या भावना व्यक्त करत लिहिलं की, "जी-7 शिखर परिषदेचा भाग होण्यासाठी भारताला आमंत्रित केल्याबद्दल आणि अप्रतिम व्यवस्थेबद्दल धन्यवाद. वाणिज्य, ऊर्जा, संरक्षण, दूरसंचार आणि इतर क्षेत्रातील भारत-इटली संबंध अधिक दृढ करण्याच्या मार्गांवर आम्ही चर्चा केली. जैवइंधन, अन्न प्रक्रिया आणि खनिजे यांसारख्या क्षेत्रांमध्ये एकत्र काम करू."