मुंबई -CANNES FILM FESTIVAL : ३० वर्षानंतर पहिल्यांदाच प्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मुख्य स्पर्धेसाठी भारतीय चित्रपट प्रवेश करत आहे. पायल कपाडियाच्या 'ऑल वुई इमॅजिन अॅज लाइट' या चित्रपटाने महोत्सवाच्या सर्वोच्च स्पर्धा श्रेणीत स्थान मिळवलं आहे. ही आनंदाची बातमी पॅरिसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आयरिस नोब्लोच आणि थियरी फ्रेमॉक्स, फेस्टिव्हलचे अध्यक्ष आणि जनरल-प्रतिनिधी यांनी सांगितली. या फिल्म फेस्टीव्हलमध्ये सामील होत असलेल्या गोष्टीतील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, पायल कपाडिया या वर्षी स्पर्धा करणाऱ्या चार महिला दिग्दर्शकांपैकी एक आहेत.
पायल कपाडिया कान्ससाठी अनोळखी नाहीत, त्यांनी त्यांच्या मागील कामांमुळे लक्ष वेधले आहे. तिनं बनवलेला 'ए नाईट ऑफ नॉट नोईंग नथिंग' या माहितीपटाला 2021 मध्ये दिग्दर्शक फोर्टनाइटमध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठी 'गोल्डन आय अवॉर्ड' मिळाला आणि 2017 मध्ये, तिचा चित्रपट 'आफ्टरनून क्लाउड्स' महोत्सवाच्या सिनेफॉन्डेशन विभागात प्रदर्शित झाला होता. पायल कपाडियाचा 'ऑल वुई इमॅजिन अॅज लाइट' हा चित्रपट फोर्ड कोपोला आणि अँड्रिया अरनॉल्ड सारख्या प्रतिष्ठित चित्रपट निर्मात्यांबरोबर प्रतिष्ठित पाल्मे डी'ओर पुरस्कारासाठी स्पर्धेत असणार आहे.
हा चित्रपट अनु आणि प्रभा या दोन नसर्सेच्या कथानकावर बेतलेला आहे. त्या दोघीही केरळमधून कामासाठी मुंबई शहरात आल्या आहेत आणि रुम पार्टनर म्हणून राहात आहेत. त्या दोघीही मैत्रिणी नाहीत, प्रभा ही वयानं मोठी, तिशी पार झालेली आहे. ती एका हॉस्पिटलमध्ये हेड नर्स म्हणून काम करते. तिचं वडिलांनी पसंत केलेल्या एका व्यक्तीशी लग्न झालंय आणि तो कामाच्या निमत्तानं परदेशात गेलाय आणि त्याच्या आयुष्यातून आता प्रभा वजा झाली आहे. तिची रुम पार्टनर अनु ही 20 वर्षांची तरुणी आहे, तिला एक बॉयफ्रेंड आहे पण ती त्याबद्दल कोणालाही सांगू शकत नाही. त्याला भेटण्याच्या जागा निवडताना तिची तारांबळ उडते. अशी ही एक दोन तरुणींची अनोखी कहानी आता कान्स फिल्म फेस्टीव्हलमध्ये झळकणार आहे.