नवी दिल्ली- Oscar winner Resul Pukutty : कान्स 2024 ग्रँड प्रिक्स विजेत्या पायल कपाडियासह फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय ) च्या विद्यार्थ्यांवरील खटला मागे घेण्याची मागणी करणारी मोहीम ऑस्कर विजेते साउंड इंजिनियर रेसुल पुकुट्टी यांनी सुरू केली आहे. पायल कपाडिया हिनं 2015 मध्ये गजेंद्र सिंह चौहान यांच्या एफटीआयआय प्रशासकीय समितीच्या अध्यक्षपदी नियुक्तीविरोधात 131 दिवसांच्या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं.
"एफटीआयआयने आता पायल आणि इतर विद्यार्थ्यांवरील खटले मागे घ्यावेत. पायलला मिळालेल्या प्रतिष्ठेची काळजी घेतली पाहिजे," असं पुकुट्टीने इंस्टाग्रामवर लिहिलं आहे. या खटल्यामध्ये पायल कपाडिया आरोपी क्रमांक 25 असून 2015 पासून सुरू असलेल्या या खटल्याच्या पुढील सुनावणीसाठी ती पुढील महिन्यात न्यायालयात हजर राहणार आहे.
2015 मध्ये, भाजपा समर्थक मानले जाणारे गजेंद्र सिंह चौहान यांच्या नियुक्तीविरोधात झालेल्या आंदोलनामुळे एफटीआयआयचा परिसर अशांत झाला होता. चौहान यांची प्रसिद्धी एवढीच होती की त्यांनी 'महाभारत' या टीव्ही मालिकेत युधिष्ठिरची भूमिका साकारली होती. पायल कपाडिया, तिच्या दुसऱ्या प्रयत्नामध्ये 2012 मध्ये एफटीआयआयमध्ये रुजू झाली होती. चौहान विरोधात 131 दिवस चाललेल्या आंदोलनातील ती एक आघाडीची नेता होती. चौहान यांना राजकुमार राव, सौमित्र चॅटर्जी, झानू बरुआ आणि नवाजुद्दीन सिद्दीकीपासून अनुपम खेरपर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी विरोध केला होता.
2024 च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ग्रँड प्रिक्स विजेता ठरल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पायल कपाडिया यांना अभिनंदनाचा संदेश पाठवला होता. गांधी यांना प्रत्युत्तरात रविवारी पायलने तिची प्रेरणा बनल्याबद्दल राहुल गांधींचे मनापासून आभार मानले. राहुल यांनी 2015 मध्ये एफटीआयआय कॅम्पसला भेट देऊन विद्यार्थी आंदोलकांना पाठिंबा दिला होता.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पायल कपाडियाचं कौतुक करत तिला अभिनंदनाचा संदेश पाठवला होता. "पायल कपाडियाला त्यांच्या ‘ऑल वुई इमॅजिन अॅज लाइट’ या कलाकृतीसाठी ७७व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ग्रँड प्रिक्स जिंकण्याच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल भारताला अभिमान आहे.एफटीआयआयची माजी विद्यार्थिनी, तिची उल्लेखनीय प्रतिभा भारतातील समृद्ध सर्जनशीलतेची झलक देऊन जागतिक स्तरावर चमकत आहे. हा प्रतिष्ठित पुरस्कार केवळ तिच्या अपवादात्मक कौशल्यांचा गौरव करत नाही तर भारतीय चित्रपट निर्मात्यांच्या नवीन पिढीला प्रेरणा देतो." असं मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलंय.