मुंबई - मल्टी स्टारर ‘मु.पो. बोंबिलवाडी’ चं नवं पोस्टर प्रकाशित करण्यात आले असून प्रशांत दामले हिटलरच्या भूमिकेत तर चर्चिलच्या भूमिकेत आनंद इंगळे दिसत आहेत. ‘हरीशचंद्राची फॅक्टरी’, ‘एलिझाबेथ एकादशी’, चि. व चि. सौ. कां, ‘वाळवी’ आणि नुकताच प्रदर्शित होऊन गेलेला 'नाच ग घुमा' सारखे एकापेक्षा एक सरस चित्रपट देणारे दिग्दर्शक परेश मोकाशी नेहमीच आशयघन विषय नर्मविनोदी ट्रीटमेंट देऊन मनोरंजक बनवतात. त्यातील तब्बल तीन चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. आता त्यांचा नवा चित्रपट येऊ घातलाय ज्याचे नाव आहे ‘मु.पो. बोंबिलवाडी १९४२ एका बॉम्बची बोंब’. नुकतंच त्याचं पोस्टर अनावरीत करण्यात आलं.
मधुगंधा कुलकर्णी, विवेक फिल्म्स आणि मयसभा करमणूक मंडळी यांच्या सह-निर्मितीत बनणाऱ्या या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केले आहे. हा चित्रपट पूर्वीच्या, त्याच नावाच्या, लोकप्रिय नाटकावर आधारित असून, कथेत काही बदल करून चित्रपट सादर करण्यात आला आहे. पोस्टरमधून ही एक स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटिशकालीन कथा असणार असल्याची कल्पना येते. नाटकाप्रमाणेच त्याचे कथानक एका बॉम्बस्फोटाच्या घटनेवर आधारित असून पोस्टरमधून विविध कलाकारांची छायाचित्रे समोर आली आहेत.