लॉस एंजेलिस - Mufasa: The Lion King : 'द लायन किंग' हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटाच्या प्रचंड यशादरम्यान, ऑस्कर विजेते दिग्दर्शक बॅरी जेनकिन्स यांनी 'द लायन किंग'च्या प्रीक्वलची घोषणा केली होती. दरम्यान डिज्नेचा आगामी चित्रपट 'मुफासा: द लायन किंग'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. 'मुफासा द लायन किंग'चा फर्स्ट लूक 2022 मध्ये रिलीज करण्यात आला होता. यानंतर 2024 मध्ये हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार असल्याचं म्हटलं जात होतं. आता अनेकजण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दोन वर्षांनंतर अखेर या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करून बॅरी जेनकिन्स यांनी चाहत्यांना सुंदर भेट दिली आहे.
'मुफासा: द लायन किंग'चा ट्रेलर रिलीज : 'मुफासा द लायन किंग'मधील खलनायक देखील लवकर समोर येईल. ट्रेलरची सुरुवात प्राण्यांपासून होते, ते त्यांचे जीवन कसे जगतात हे दाखवले जाते. त्यानंतर मुफासाची ओळख करून दिली जाते. मुफासा आणि इतर काही प्राणी ज्या प्रकारे ट्रेलरमध्ये सादर केले आहेत ते कौतुकास्पद आहे. हा ट्रेलर प्रेक्षकांना खूप आवडला आहे. 'द लायन किंग' या हिट म्युझिकल चित्रपटाच्या प्रीक्वलमध्ये, यंग मुफासा आणि त्याचा भाऊ स्कार यांची कहाणी दाखवली जाणार आहे. डिज्नेनं 'मुफासा द लायन किंग' ट्रेलर रिलीज करत कॅप्शनमध्ये लिहिलं, "मुफासा ज्यानं आमचे आयुष्य कायमचे बदलले." ॲरॉन पियरे हा मुफासाच्या कॅरेक्टरला आवाज देणार आहे.