मुंबई - सरकारी यंत्रणा भ्रष्टाचारानं पोखरल्याची टीका अनेक वेळा ऐकू येते. कितीही आंदोलनं झाली असली तरी भ्रष्टाचाराला आळा काही बसलेला नाही. सातत्यानं नवनवीन धक्कादायक प्रकरणं उघडकीस येतात आणि झाल्या प्रकारानं जनता आश्चर्य चकित होते. हा कारभार बेमालुमपणे करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या-क्लृपत्या वापरल्या जातात. सरकारी योजना कितीही चांगल्या असल्या तरी त्याच्या अंमलबजावणीत भरपूर त्रुटी असतात. याचा उपयोग करुन भ्रष्टाचाऱ्यांचंही फावतं. खऱ्या अर्थानं या योजनांचा लाभ लोकापर्यंत पोहोचतच नाही. अगदी अलीकडचं उदाहरण घ्यायचं तर 'लाडकी बहिण' योजना उत्तम असली तरी या योजनेसाठी लागणारी खोटी कागदपत्रं तयार करुन एकाच व्यक्तीनं अनेक नावावर अर्ज केले आणि सरकारचे पैसे उकळल्याचं उघड झालं होतं. माजी पंतप्रधान राजीव गांधीनींही भ्रष्टाचाराच्या विषयावर एकदा भाष्य करताना सरकारनं 100 रुपये देऊ केले तर जनतेपर्यंत केवळ 15 रुपये पोहोचतात आणि बाकीचा मलिदा मधल्या मध्ये दलाल खातात असा दावा केला होता. भ्रष्टाचाराचा विषय सार्वत्रिक आहे. आपल्या देशाला हा फार मोठा शाप असल्यामुळंच देशात अनेक आंदोलनंही झाली. दिल्लीच्या रामलीला मैदानावर झालेलं अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखालील आंदोलनंही ऐतिहासिक ठरलं होतं.
'जाऊ तिथं खाऊ' चा हिंदीतही रिमेक -सामान्य जनता भ्रष्टाचाराला कंटाळली आहे. या समस्येच्या विरोधातली लढाई करण्याची शक्ती हरवत चालली आहे. हाच विषय घेऊन आजवर अनेक कथा, कादंबऱ्या आणि चित्रपटही बनले आहेत. काही वर्षापूर्वी महाराष्ट्रात विहीर चोरीला गेल्याचं प्रकरण गाजलं होतं. असं असलं तरी अजूनही अधून मधून अशी प्रकरणं पुन्हा घडतातच. याच्या बातम्याही वर्तमानपत्रात आणि टीव्हीवरुन झळकतात. विहीर चोरीला गेल्याच्या प्रकरणावरुन यापूर्वी असे अनेक चित्रपट तयार झाले आहेत. 'वेल डन अब्बा' हा हिंदी भाषेतील चित्रपट 2010 मध्ये बनला होता. यामध्ये अभिनेता बोमन इराणी यानं मुख्य भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे हा चित्रपट मकरंद अनासपुरे यांची भूमिका असलेल्या 'जाऊ तिथं खाऊ' या चित्रपटावर आधारित होता.