मुंबई - Shah Rukh Khan :देशभरात लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा 20 मे रोजी होत असून त्यात महाराष्ट्रातही मतदान होणार आहे. दरम्यान, सुपरस्टार शाहरुख खाननं शनिवारी आपल्या सोशल मीडियावर देशातील लोकांना बोटांवर शाई लावण्यासाठी प्रोत्साहित केलं. म्हणजेच लोकशाहीच्या या उत्सवात सर्व देशवासीयांनी पुढे येऊन सहभागी व्हावे, असे आवाहन त्यानं केलं. शाहरुखन आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिलं की, "आपण एक भारतीय म्हणून आपलं कर्तव्य करूया आणि आपल्या देशाचं हित लक्षात घेऊन मतदान करूया. पुढं व्हा आणि मतदानाच्या अधिकाराचा प्रचार करा." शाहरूखची पोस्ट त्याच्या चाहत्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
'किंग खान'ची पोस्ट व्हायरल : मतदानाबद्दल प्रतिक्रिया देताना एका चाहत्यांनं 'जवान' मधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जनतेला सांगण्यात येत आहे की निवडणुकीत उभं असलेल्या उमेदवारांना प्रश्न विचारा की, पुढील 5 वर्षांत ते तुमच्यासाठी काय करतील, कुटुंबातील कोणी आजारी पडल्यास त्याच्या उपचारासाठी ते काय करणार आहेत?, नोकरी मिळवून देण्यासाठी ते काय करणार आहेत? या व्हिडिओद्वारे मतदानाविषयी लोकांना जागृत करण्याच काम केलं जात आहे. दरम्यान, या व्हिडिओवर आता अनेक कमेंट्स करत आहेत. काही चाहते आम्ही नक्की मतदान करू, असं म्हणताना कमेंट विभागात दिसत आहेत.