मुंबई -Shah Rukh Khan : बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान 77व्या लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी स्वित्झर्लंडमध्ये पोहोचला आहे. या मोठ्या मंचावर किंग खानला कधी सन्मानित केलं जाईल याची सर्वजण वाट पाहात असतानाच, या चित्रपट महोत्सवातील शाहरुख खानचे काही फोटो समोर आले आहेत. शनिवारी दुपारी लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलनं शाहरुख खानचे पोस्टर शेअर केले, यामध्ये किंग खाननं स्टायलिश लूकनं चाहत्यांची मनं जिंकली आहेत. पोस्टरमध्ये शाहरुख खान ब्लॅक ब्लेझर आणि मॅचिंग ट्राउझर्समध्ये खूप सुंदर दिसत आहे.
चाहत्यांनी शाहरुखचं केलं कौतुक : शाहरुखचं हे पोस्टर शेअर केल्यानंतर लगेचच चाहत्यांनी कमेंट विभागात कौतुकाचा वर्षाव केला. एका चाहत्यानं यावर लिहिलं, "भारतीय चित्रपटसृष्टीचा किंग" दुसऱ्या एकानं लिहिलं, "शाहरुख खान एक भावना आहे, त्याला बॉलिवूडनं प्रसिद्ध केलं नाही, त्यानं बॉलिवूडला प्रसिद्ध केलं आहे." शाहरुख खानला आज लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये करिअर अचिव्हमेंट अवॉर्ड - परडो अल्ला कॅरिएरानं सन्मानित केलं जाणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी हा पुरस्कार दिला जात आहे. त्यानं आपल्या करिअरमध्ये 100 हून अधिक चित्रपट केले आहेत. पियाझा ग्रांडे येथे संध्याकाळी हा पुरस्कार सोहळा होणार आहे. याशिवाय खानच्या कारकिर्दीतील एक खास चित्रपट 'देवदास' फेस्टिव्हलमध्ये दाखवला जाईल.