मुंबई - Kanguva Trailer Out : साऊथचा 'सिंघम' सूर्या त्याचा आगामी चित्रपट 'कांगुवा'च्या प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक शिवा दिग्दर्शित 'कांगुवा' हा चित्रपट यावर्षी 10 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सूर्या आणि बॉबी देओल यांची मुख्य भूमिका असलेला 'कांगुवा' या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या प्रदर्शनाची अनेकजण वाट पाहात आहेत. या चित्रपटाच्या पोस्टर्स आणि टीझरनं आधीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवली आहे आणि आता ट्रेलर आज 12 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर सोशल मीडियावर या चित्रपटाबद्दल चर्चा होताना दिसत आहे.
सूर्या आणि बॉबी देओलची लढत : 'कांगुवा'मधील धमाकेदार ट्रेलरमध्ये सूर्या आणि बॉबी देओल यांच्यात लढत पाहायला मिळत आहे. निर्मात्यांनी शेअर केलेल्या ट्रेलरमध्ये सूर्या हा धमाकेदार अॅक्शन करताना दिसत आहे. दरम्यान 11 ऑगस्ट रोजी, बॉबी देओलनं त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर 'कांगुवा'चं नवीन पोस्टर शेअर केलं होतं. याच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं होतं, "कांगुवा'बरोबर, आम्ही तुमच्यासाठी एक दमदार कहाणी घेऊन येत आहोत. 12 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता हा ट्रेलर प्रदर्शित होईल. तुम्ही तयार आहात का?" यानंतर बॉबीच्या या पोस्टवर अनेकांनी आपली प्रतिक्रिया दिली होती.