मुंबई - Albattya Galbattya :प्रायोगिक, व्यावसायिक नाट्यसृष्टीच्या युगात सध्याच्या घडीला लहान मुलांसाठी काही विशेष नाटकं रंगभूमीवर आली आहेत. या नाटकांनी लहानांबरोबर मोठ्यांचीही मनं जिंकली आहेत. 'अलबत्या गलबत्या' हे नाटकही त्यापैकीच एक. रत्नाकर मतकरी लिखित हे नाटक रंगभूमीवर आणण्याचं काम निर्माते शिवधनुष्य आणि राहुल भंडारे यांनी केलं आहे. या बालनाट्यानं आता एक इतिहास रचला आहे. 'अलबत्या गलबत्या' या नाटकाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. आता हे नाटक एका नव्या विश्वविक्रमासाठी सज्ज झालं आहे.
स्वातंत्र्यदिनी पाहा 'अलबत्या गलबत्या' : झी मराठी प्रस्तुत आणि अद्वैत थिएटर निर्मित 'अलबत्या गलबत्या' या नाटकाची टीम येत्या स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टला सलग 6 प्रयोग करत मराठी बालरंगभूमीच्या इतिहासात पहिल्यांदाच जागतिक विक्रम करणार आहे. सकाळी 7.00 ते रात्री 10.30 यावेळेत हे 6 विश्वविक्रमी प्रयोग दादरच्या श्री शिवाजी मंदिरमध्ये रंगणार आहेत. मराठी रंगभूमीवर 'माईलस्टोन' ठरलेल्या या नाट्यकृतीचा अशा प्रकारचा प्रयोग कलाकार, तंत्रज्ञ या सर्वांनाच एक मोठं आव्हान असलं तरी कलावंतांना यामधून खूप काही शिकायला मिळेल, असं मत निर्माते राहुल भंडारे यांनी व्यक्त केलंय. हा भव्य नाट्यपट एकाच दिवशी, एकाच थिएटरमध्ये एकापाठोपाठ बघणं म्हणजे नाट्यरसिकांसाठी पर्वणीच आहे. या सलग नाट्यानुभवाच्या संकल्पनेला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, या नाटकाची जोरदार तिकीटविक्री सुरू झाली आहे. स्वातंत्र्यदिनी, स्वातंत्र्याचा आनंद द्विगुणित करायचा असेल तर 'अलबत्या गलबत्या' नाटकाचे होणारे हे सलग प्रयोग अजिबात चुकवू नका.