मुंबई - IND vs PAK Match :न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी क्रिकेट स्टेडियमवर टी-20 विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना झाला. पाकिस्ताननं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी भारतीय संघाला 19 ओव्हरमध्ये बाद केलं. भारतानं पाकिस्तानला 120 धावांचे लक्ष्य दिलं होतं. चांगली सुरुवात करूनही पाकिस्तानला भारतीय संघाकडून पराभव पत्करावा लागला. भारतीय संघानं पाकिस्तान संघाला 6 धावांनी पराभूत केलं. टी-20 विश्वचषकस्पर्धेत पाकिस्तानचा सातव्यांदा पराभव झाल्यानंतर पाकिस्तानमधील लोक नाराज झाल्याचं यावेळी दिसलं. आता भारतीय संघ जिंकल्याचा जल्लोष साजरा होताना दिसत आहे. अनेकजण सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आपला आनंद व्यक्त करत आहेत.
भारताच्या विजयावर अनुष्का शर्माची प्रतिक्रिया :सामना संपताच विराट कोहलीची पत्नी-बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानं आनंदानं उडी घेतली आणि उत्साहात आपल्या मुठी आवळल्या. यावेळी अनुष्का ही कॅज्युअल लूकमध्ये होती. अनुष्काचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दुसरीकडे रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भारताच्या विजयानंतर, रितिका ही उभी राहून भारतीय संघाचं अभिनंदन करताना दिसत आहे. तिनं आपल्या मुलीबरोबर मॅचचा आनंद घेतला आहे.