मुंबई - IC 814: The Kandahar Hijack : हिंदू सेनेचे प्रमुख सुरजीत सिंह यादव यांनी दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका (पीआयएल) दाखल करून नेटफ्लिक्स वेब सीरीज 'आईसी 814 द कंधार हाईजॅक'वर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या वेब सीरीजमध्ये दहशतवाद्यांची नावे हिंदू देण्यात आली आहेत. त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. दहशतवाद्यांची खरी ओळख लपवून ठेवण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्यानं केला आहे. वकील शशी रंजन यांच्यानुसार अनुभव सिन्हा-दिग्दर्शित 'आईसी 814 द कंधार हायजॅक' मध्ये 1999ला झालेल्या भारतीय फ्लाइट 814बद्दल चुकीचं दाखवलं गेलं आहे.
'आईसी 814 द कंधार हायजॅक' वादाच्या भोवऱ्यात : अपहरणकर्त्यांनी ओळख लपवणं हे चुकीचं आहे. या धक्कादायक घटनेचं चुकीचं चित्रण करणे हानिकारक असल्याचं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे. याचिकेत दावा करण्यात आला आहे की, इब्राहिम अख्तर, शाहिद अख्तर सईद, सनी अहमद काझी, जहूर मिस्त्री आणि शाकीर यांना 'भोला' आणि 'शंकर' अशी चुकीची नावे देण्यात आली आहेत. यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. सार्वजनिक गैरसमज आणि संभाव्य हानी टाळण्यासाठी याचिकाकर्त्यानं न्यायालयाच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. या याचिकेत पुढे सांगण्यात आलं आहे की, बहुधर्मीय समाजात धर्मनिरपेक्षता आणि धार्मिक सलोखा राखणारी भारतीय राज्यघटना सर्व धर्मांचा परस्पर आदर आणि मूलभूत हक्क हे अनिवार्य करते.