मुंबई - Ibrahim ali khan and Khushi kapoor :सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान लवकरच हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. तो करण जोहरच्या चित्रपटात दिसणार असल्याचं बोललं जात आहे, ज्यामध्ये खुशी कपूर मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत होती. आता या चित्रपटाचे शीर्षक समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाचे नाव 'नादानियां' आहे. करण जोहर त्याच्या आगामी चित्रपटातून इब्राहिमला हिरोच्या रुपात लॉन्च करत आहे. 'नादानियां' हा चित्रपट करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनवला जात आहे. सध्या इब्राहिम अली खान दिग्दर्शनाचे कौशल्य शिकत आहेत.
इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर दिसणार एकत्र : इब्राहिम करण जोहरबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत आहे. त्यानं करणला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात असिस्ट केलं होतं. दुसरीकडे खुशी कपूरनं झोया अख्तरच्या 'द आर्चिज' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. खुशीच्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटामध्ये सुहाना खान आणि अमिताभ बच्चनचा नातू अगस्त्य नंदा यांच्यासह अनेक स्टार किड्सनं हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. दरम्यान इब्राहिम आणि खुशीचा 'नादानियां' चित्रपट एक रोमँटिक कॉमेडी असेल असे सांगण्यात येत आहे.