मुंबई - Tamayo Perry Dies : 'पायरट्स ऑफ द कॅरिबियन' स्टार तामायो पेरीचा रविवारी हवाईमध्ये मृत्यू झाला. तो ओआहू बेटावर सर्फिंग करत असताना त्याच्यावर गोटआयलँडजवळ एका शार्कनं हल्ला केला. हा हल्ला इतका जोरदार होता की त्याला आपला जीव गमवावा लागला. त्याचं वय 49 वर्षांचे होतं. 'पायरेट्स ऑफ द कॅरिबियन: ऑन स्ट्रेंजर टाइड्स'मध्ये त्यानं महत्त्वाची भूमिका साकारली होती. जेव्हा तामायो पेरीवर शार्कनं हल्ला झाला, तेव्हा एका जवळच्या व्यक्तीनं आपत्कालीन सेवांना संपर्क केला होता. अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्याला जेट स्कीवर किनाऱ्यावर आणले, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला समुद्रकिनाऱ्यावर मृत घोषित केलं.
शार्कच्या चाव्यामुळे झाली गंभीर जखम :तामायो पेरीच्या मृत्यूनंतर, तेथे शार्क असल्याचं सांगण्यात आलं. अहवालानुसार तामायोच्या शरीरावर शार्क चावल्यामुळे गंभीर जखमा झाल्या होत्या. जुलै 2016 मध्ये त्यानं जीवरक्षक म्हणून महासागर सुरक्षा विभागाबरोबर काम करण्याची सुरुवात केली होती. तामायो पेरी हा एक सर्फिंग प्रशिक्षक देखील होता. वर्ल्ड सर्फ लीगनं त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि ट्विटरवर पोस्ट शेअर केली आहे. तसेच सर्फ समुदायानं रविवारी पोस्ट करून लिहिलं होतं, "एक प्रिय अभिनेता गमावला हे सांगताना आम्हाला खूप दुःख होत आहे. तामायो पेरी, एक प्रसिद्ध सर्फर आणि लाइफगार्ड, ओआहूच्या पूर्वेकडील शार्क हल्ल्यात जखमी झाल्यानंतर मरण पावला."