मुंबई - Happy Birthday Priyanka Chopra :प्रियांका चोप्रा 18 जुलैला तिचा 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिनं 2000 मध्ये वयाच्या 18 व्या वर्षी मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. या यशानंतरच तिला चित्रपटाच्या ऑफर्स येऊ लागल्या.'थामिजान' या तमिळ चित्रपटातून तिनं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. 2003 मध्ये 'द हीरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय' या चित्रपटाद्वारे तिनं बॉलिवूडमध्ये एंट्री केली. या चित्रपटात तिच्याबरोबर सनी देओल आणि प्रिती झिंटा दिसले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. या चित्रपटानंतर तिनं अनेक चित्रपटामध्ये काम केलं. यानंतर तिला बॉलिवूडमध्ये एक नवीन ओळख मिळाली.
प्रियांका चोप्राचं करिअर : प्रियांकानं बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहे. तिनं 'अंदाज', ऐतराज','मुझसे शादी करोगी', 'डॉन' आणि 'क्रिश' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. प्रियांकानं सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमारसह अनेक सुपरस्टार्सबरोबर काम केलंय. 2015 पर्यंत प्रियांकानं बॉलिवूडमध्ये खूप काम केलं . त्यानंतर तिनं बॉलिवूड चित्रपटांकडे फारसे लक्ष दिलं नाही. आजही ती बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आता 'देसी गर्ल' ग्लोबल स्टार झाली आहे. बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवल्यानंतर ती हॉलिवूडकडे गेली. ती हॉलिवूडमध्ये 9 वर्षांपासून काम करत आहे.