मुंबई Happy Birthday Jeetendra :जीतूजी या नावानं ओळखल्या जाणारा जितेंद्र हा हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहे. आजही तो लोकांच्या मनावर राज्य करतो. 70 आणि 80 च्या दशकात बॉक्स ऑफिसवर त्यानं अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्याचा डॅशिंग लूक आणि त्याचा डान्स हा अनेकांना आवडत होता. याशिवाय त्याचा अभिनय सुंदर असल्यानं त्याच्यावर अनेकजण जीव ओवाळून टाकत होते. 'जम्पिंग जॅक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याचा आज 7 एप्रिल रोजी 75वा वाढदिवस आहे. या विशेष प्रसंगी त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही रंजक गोष्टींबद्दल जाणून घेऊया.
जितेंद्रचं फिल्मी करिअर :व्ही शांताराम यांच्या 'नवरंग' या चित्रपटातून ज्युनियर आर्टिस्ट म्हणून जितेंद्रनं आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. यानंतर बॉक्स ऑफिसवर त्यानं 'फर्ज', 'हमजोली', 'धरम वीर', 'तोहफा', 'कारवां', 'हिम्मतवाला' असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. मीडिया रिपोर्ट्सनुसार जितेंद्र यांची भेट त्याच्या पत्नीशी म्हणजेच शोभा सिप्पीबरोबर झाली, तेव्हा त्यांची पत्नी 14 वर्षाची होती. दरम्यान वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी जितेंद्रवर पडली, यानंतर ते आपल्या कामात व्यग्र झाले. त्यानंतर त्याची भेट रेखाबरोबर 'बेचारा' चित्रपटाच्या सेटवर झाली. त्याला रेखा पाहता क्षणी आवडली.