मुंबई Anant Ambani Radhika Merchant :अंबानी कुटुंबानं अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न मोठ्या थाटात केल्यानंतर, आता अँटिलियामध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. अंबानी कुटुंबात एक भव्य सोहळा साजरा केला जात आहे. आज देशात सर्वत्र गणपती बाप्पाचं स्वागत केलं जात आहे. दरम्यान अंबानी कुटुंबात आता पार्टीसारखं वातावरण आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गणपती बाप्पाच्या भव्य स्वागतात मुकेश अंबानीनं काही कमी ठेवलेली नाही. आता सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये अंबानी कुटुंबातील सदस्य खूप खुश असल्याचे दिसत आहे. दरम्यान नुकतेच अनंत अंबानी आणि रिलायन्स फाऊंडेशननं लालाबागच्या राजाला 20 किलोचा सोन्याचं मुकूट चढवला आहे. याची किंमत जवळपास 15 कोटी असल्याचं सांगितलं जात आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा व्हिडिओ व्हायरल : तसेच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट संपूर्ण कुटुंबासह अँटिलियाचा राजा यांचं भव्य स्वागत करताना दिसत आहेत. पिवळ्या झेंडूच्या फुलांनी सजवलेल्या मिनी ट्रकमध्ये गणेशाची मूर्ती अँटिलियामध्ये आणण्यात येत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. अंबानी कुटुंबातील गणपती बाप्पाची खास झलक सर्वांसमोर आली आहे. ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पाचं स्वागत खूप विशेष पद्धतीनं करण्यात आलं आहे. यादरम्यान राधिका मर्चंटनं लाल रंगाचा पोशाख परिधान केला होता. दुसरीकडं अनंत अंबानीनं केशरी रंगाचा पोशाख घातला होता. मुकेश अंबानी आणि ईशा अंबानी यांचीही झलक या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाली.