नाशिक - Smriti Biswas Narang passed away : ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती बिस्वास नारंग यांनी तीन जुलैला रात्री नाशिक रोड येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीत आपल्या सदाबहार अभिनयाच्या जोरावर अधिराज्य गाजविले. त्या शंभर वर्षाच्या होत्या. आज त्यांच्यावर ख्रिश्चन पद्धतीनं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले आहेत. त्याच्या निधनामुळं चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
स्मृती बिस्वासचं झालं निधन : दादासाहेब फाळके गोल्डन इरा पुरस्कारानं सन्मानित असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती बिस्वास नारंग यांचं वयाच्या 100 व्या वर्षी वृद्धकाळानं नाशिकमध्ये निधन झालं. सण 1960 संपल्यानंतर त्या काही काळ कोलकत्ता, लाहोर, मुंबई राहिल्या. यानंतर त्या वृद्धापकाळात नाशिक येथे राहत होत्या. स्मृती बिस्वास यांचा चार महिन्यापूर्वी 17 फेब्रुवारी 2024 रोजी 100 वा वाढदिवस साजरा झाला. त्यांचा जन्म आजच्या बांगलादेशातील ढाक्याजवळ असलेल्या भरोसापूर येथे झाला होता. वडील नरेंद्र कुमार आणि आई ज्योती हे दोघेही शिक्षक होते. त्यांचे शिक्षण कोलकत्ता येथे झाले. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांना बंगाली चित्रपटात दिग्दर्शक सत्यजित रॉय यांच्या 'संध्या' चित्रपटात बालकलाकार म्हणून त्यांना संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. 1952 ते 1960 या काळात त्यांनी दिग्दर्शक, अभिनेते डॉ. एस. डी. नारंग यांच्यासह बॉलिवूडमधील किशोर कुमार, गुरुदत्त, देवानंद, राजकपूर, अशोक कुमार, बलराज सहानी, भगवान दादा तसेच अभिनेत्री नूतन, कामिनी, शशिकला, नर्गिस, निरुपमा यांच्याबरोबर अनेक चित्रपटात काम केलं होतं.