मुंबई Eros Cinema :स्वप्नांचं शहर अशी मुंबईची ओळख आहे. इथं अनेक तरुण स्वप्न घेऊन येतात आणि त्यासाठी दिवस रात्र मेहनत करत असतात. काही जण आपल्याला चांगली नोकरी लागेल, आपण सेटल होऊ अशा विचारात असतात. तर, काहीजण आपण मुंबईत येऊन बिझनेस सुरू करू आणि एक मोठा बिझनेस उभा करू अशी स्वप्नं बघतात. मात्र, या सगळ्या स्वप्न बघणाऱ्यांमधीलच आणखी एक मोठा वर्ग आहे. तो म्हणजे मुंबईत येऊन चित्रपटात काम करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्यांचा. अनेक तरुण मुंबईत येऊन आपल्याला चित्रपटात काम मिळेल, आपण देखील मोठे कलाकार होऊ असे स्वप्न बाळगतात. आज अनेक सेलिब्रिटी असे आहेत ज्यांनी अशी स्वप्नं पाहिली. या तरुणांच्या स्वप्नांचा इतिहास मुंबईतल्या एका सिनेमागृहानं खूप जवळून पाहिलाय. ते म्हणजे मुंबईतल्या चर्चगेट येथील 'इरॉस' चित्रपटगृह.
मुंबई सोबतच भारतीय चित्रपटसृष्टीचा 90 वर्षांचा इतिहास आपल्या उराशी बाळगणारे चर्चगेट येथील इरॉस सिनेमागृह आता तब्बल सात वर्षांनी पुन्हा एकदा चित्रपट प्रेमींच्या सेवेत दाखल झाले आहे. या चित्रपटगृहाचा इतिहास देखील तितकाच रंजक आहे. 2017 साली प्रदर्शित झालेला 'बाहुबली 2' हा इथे दाखवण्यात आलेला शेवटचा सिनेमा ठरला. त्यानंतर सिनेमाची वास्तू जुनी झाल्यानं आणि त्याच्या नूतनीकरणसाठी ते बंद करण्यात आलं. आता या चित्रपटात गृहाचं काम पूर्ण झालं असून, आजपासून ते आता पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालं आहे.
चित्रपटगृहाचा इतिहास : या चित्रपटगृहाचा इतिहास असा की सन 1935 मध्ये पारशी व्यापारी शियावक्स कावसजी कंबाटा यांनी एक चित्रपट गृह निर्माण करण्याचं ठरवलं. आता हे काम कुणाला द्यायचं? हा विचार करत असतानाच त्यांच्या डोक्यात त्याकाळचे प्रसिद्ध वास्तुविशारत सोहराबजी भेदवार यांचं नाव डोळ्यासमोर आलं. लागोलाग त्यांनी आपल्या डोक्यातील कल्पना भेदवार यांना सांगितल्या आणि वास्तुविषारद भेदवार यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. हे चित्रपटगृह ग्रीक शैलीवर आधारित आहे. इरॉस हे एका ग्रीक देवतेचे नाव असून, या ईश्वराच्या नावाच्या धरतीवर ही वास्तू बनवण्यात आली आहे. शियावक्स कावसजी कंबाटा यांनी 1935 मध्ये पाहिलेले स्वप्न 1938 साली पूर्ण झालं आणि अखेर 10 फेब्रुवारी 1938 रोजी हे चित्रपटगृह प्रेक्षकांसाठी खुले करण्यात आले.
चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या अगदी पलिकडे व्ही-आकाराच्या कंबाटा इमारतीत असलेले इरॉस सिनेमा एप्रिल 2017 मध्ये डागडुजीच्या कारणास्तव बंद करण्यात आले. या वास्तूच्या भिंती मजबूत आणि सुस्थितीत होत्या. मात्र, छताचं नुकसान झालं होते. फ्लोरिंग देखील खराब झालं होतं. इमारत जुनी असल्याने त्याची दुरुस्ती करणे आवश्यक होतं. अखेर 2019 ला दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. अखेर 2024 मध्ये दुरुस्तीचं काम पूर्ण होऊन 9 फेब्रुवारी 2024 रोजी हे चित्रपटगृह पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी खुलं करण्यात आलं आहे.