मुंबई - Ek Dok Thien Char trailer : प्रेम, लग्न, बाळंतपण आदी गोष्टींचं तरुणाईला अप्रूप वाटत असलं तरी जेव्हा प्रत्यक्षात ते अनुभवण्याची पाळी येते तेव्हा त्यांच्यावर गांगरून जाण्याची वेळ येते. आजच्या युगातील नव्या जोडप्यांची कथा आणि संघर्ष दाखवणारा चित्रपट येऊ घातलाय ज्याचे नाव आहे 'एक दोन तीन चार' जो सादर केला आहे जिओ स्टुडिओजने आणि वरुण नार्वेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. हा एक धमाल चित्रपट असून, 'एक दोन तीन चार' मधून वैदेहीला चार बाळं की, सहा बाळं होणार हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल.
आधुनिक जोडप्यांची कथा आणि संघर्ष दाखवणारा 'एक दोन तीन चार' या चित्रपटाचा रंगतदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमधून समीर आणि सायली यांच्या प्रेमकथेचे आनंदी आयुष्य कसे रोलरकोस्टर प्रवासासारखे विविध वळणं घेते याचा अंदाज येतो. वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी समीर आणि सायलीचे लग्न होते आणि लगेचच गोड बातमी येते. या गोड बातमीमुळे त्यांची तारांबळ कशी उडते हे पाहणे मजेदार ठरणार आहे. ट्रेलर बघताना असे वाटते की त्यांना एक नाही, दोन नाही, तर चार मुलं होणार आहेत. पण शेवटी वैदेहीने सहा बाळांची बातमी देऊन प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.