मुंबई - Tisha Kumar Demise: टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांची चुलत बहीण आणि अभिनेता कृष्णा कुमार यांची मुलगी तिशा कुमारचं गुरुवारी 18 जुलै रोजी दुःखद निधन झालं. दीर्घ आजाराशी झुंज देत तिशानं खूप कमी वयात जगातून निरोप घेतला. तिचं वय 21 वर्ष होतं. तिशा ही गुलशन कुमार यांची भाची आणि संगीतकार अजित सिंग यांची नात होती. मंगळवारी मुंबईत मुसळधार पावसात तिशाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला. अत्यंविधीदरम्यान तिशाचे वडील कृष्णा कुमार आणि तिची आई अस्वस्थ दिसले. या कठीण काळात संपूर्ण कुटुंब एकत्र आलं होतं. तिशाची वहिनी आणि भूषण कुमारची पत्नी अभिनेत्री दिव्या खोसला कुमारही कुटुंबाबरोबर यावेळी दिसली. नणंद तिशाच्या मृत्यूच्या दु:खानं दिव्या खोशलाही हादरली आहे. तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आपलं दुःख व्यक्त केलं आहे. तिनं इंस्टाग्रामवर एक न पाहिलेला फोटो शेअर केला आहे.
दिव्या खोसलानं शेअर केली पोस्ट :तिशा कुमारच्या जाण्याचं दु:ख कुटुंबासाठी खूप मोठं असल्याचं दिव्यानं सांगितलं आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये दिव्या खोसलानं तिशाची आई तान्या सिंगला हिंम्मत देण्याचा प्रयत्न केला आहे. दिव्यानं पोस्टवर लिहिलं "तिशा तू नेहमी आमच्या हृदयात राहशील. इतक्या लवकर गेली. तान्या सिंग देव तुम्हाला या सर्वात दु:खावर मात करण्याची शक्ती देवो." तिशा कुमार कर्करोगासारख्या गंभीर आजारानं ग्रासलेली होती. मुंबईत दीर्घ उपचारानंतर तिला जर्मनीला हलवण्यात आलं होतं. जर्मनीतील रुग्णालयात दाखल असलेल्या तिशाचा उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.