मुंबई - Devara: Part 1 : 'देवरा: पार्ट 1' हा ज्युनियर एनटीआरचा सहा वर्षांतील सोलो लीड म्हणून पहिला रिलीज आहे. 'आरआरआर'नंतर, 'देवरा: पार्ट 1' चित्रपटामधून रुपेरी पडद्यावर धमाका करत आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 27 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी चाहते खूप उत्सुक होते. दरम्यान 'देवरा: पार्ट 1' रिलीज होण्यापूर्वी वेगवेगळ्या शहरांमध्ये फटाक्यांसह जल्लोष केला गेला होता. बेंगळुरूमधील एका थिएटरमध्ये ज्युनियर एनटीआरच्या कट -आउटला आग लागली. या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र याठिकाणी आग लागल्यानंतर खूप गोंधळ उडाला होता.
ज्युनियर एनटीआरच्या कट- आउटला लागली आग : सध्या बेंगळुरुमधील थिएटर्सच्या बाहेर ज्युनियर एनटीआरचे पोस्टर्स आणि कट-आउट्स लावण्यात आले आहेत. एक्सवर आता काही व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये ज्युनियर एनटीआरचे चाहते थिएटरबाहेर फटाके फोडतांना दिसत आहेत. यामुळेच ज्युनियर एनटीआरच्या कटआउटला आग लागली होती. यानंतर एका व्यक्तीनं समजदारपणा दाखवत ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. यावेळी कसेबसे आगीवर नियंत्रण मिळवता आले. यानंतर सर्वजण त्या व्यक्तीचे कौतुक करत आहेत. एका एक्स यूजर्सनं या घटनेचा व्हिडिओ त्याच्या पेजवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'बेंगळुरूमध्ये संध्याकाळी कट-आउटला आग लागली. सर्वजण सुरक्षित आहेत. एका व्यक्तीनं तातडीनं वर जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. यामध्ये आम्ही यशस्वी झालो. विग्नेश अनुकुंटा अथानी असं या व्यक्तीचं नाव आहे.'