मुंबई - Devara Part 1 First Song Fear : साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआर 20 मे रोजी आपला वाढदिवस साजरा करणार आहे. त्याआधी तो आपल्या चाहत्यांना एक मोठी भेट देणार आहे. एनटीआरच्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'देवरा पार्ट 1'चं पहिलं गाणं रिलीज होणार आहे. चाहत्यांना वाढदिवसापूर्वी हे गिफ्ट मिळणार आहे. 'देवरा पार्ट 1'मध्ये ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन कोरताला शिवा यांनी केलंय. 'देवरा पार्ट 1' या चित्रपटाबद्दल एनटीआरच्या चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे, कारण 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आरआरआर' चित्रपटानंतर तो कुठल्याही चित्रपटामध्ये झळकला नाही.
गाणं कधी रिलीज होईल? :ज्युनियर एनटीआर 20 मे रोजी 41 वर्षांचा होणार आहे. याआधी 19 मे रोजी 'देवरा पार्ट 1' चे निर्माते चित्रपटामधील पहिलं गाणं 'फियर' रिलीज करणार आहेत. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध रविचंदर यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे. दरम्यान या चित्रपटाच्या निर्मात्यांनी म्हटलं आहे की, रजनीकांतच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'जेलर'मधील 'हुकुम' या सुपरहिट गाण्यापेक्षा 'फियर' हे अधिक धमाकेदार असेल. 'हुकुम' हे गाणेही अनिरुद्धनेच संगीतबद्ध केलं होतं. 'देवरा पार्ट' च्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल बोलायचं झालं तर, हा चित्रपट 10 ऑक्टोबर 2024 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.