मुंबई - 'बिग बॉस' विजेता सूरज चव्हाण यानं मोठ्या पडद्यावर पदार्पण केलेला 'राजा राणी' हा चित्रपट 18 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो. महाराष्ट्रभर रिलीज झालेल्या या चित्रपटाची कथा समजासमोर चुकीचा संदेश देणारी असल्याची भूमिका घेऊन यावर बंदी यावी अशी मागणी काही लोक करत आहेत. मात्र हा सिनेमा तसा नाही, तुम्ही प्रत्यक्ष जाऊन थिएटरमध्ये सिनेमा पाहण्याचं आवाहन बिग बॉस विजेता आणि या चित्रपटाचा कलाकार सूरज चव्हाणनं केलंय. या चित्रपटावर अन्याय होतोय असंही त्यानं बोलून दाखवलं.
'राजा राणी' चित्रपटाचा नायक रोहन पाटील यानं निवेदन करताना सांगितलं की, सूरज चव्हाणसारखा एक सामान्य घरातील मुलगा यशाच्या दिशेनं वाटचाल करतोय. परंतु समाजातील काही लोकांना हे बघवतं नाही, त्यामुळेच 'राजा राणी'वर बंदी करण्याची मागणी केली जात आहे. या चित्रपटात चुकीचं असं काहीच नाही. हा केवळ प्रपोगंडा असल्याचं सांगत या चित्रपटाला सहकार्य करण्याचं आवाहनही त्यानं केलंय. या चित्रपटात सूरज चव्हाणची मोठी भूमिका असल्याचं रोहननं सांगितलं.