मुंबई Ranveer Deepika First Child : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या होणाऱ्या बाळाची चाहते आतुरतेनं वाट पाहत होते. अखेर तो क्षण आलाच. दीपिकानं एका गोंडस बाळाला जन्म दिलाय. दीपिका आणि रणवीर यांना 'कन्यारत्न' झालं. पोस्ट शेअर करत त्यांनी ही गुड न्यूज दिली.
जोडीनं घेतलं होतं सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन : शुक्रवारी दीपिका आणि रणवीरनं सहकुटुंब सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन घेतलं होतं. रविवारी सायंकाळी दीपिका आणि रणवीर मुंबईच्या 'एचएन रिलायंस हॉस्पिटल'मध्ये पोहोचले होते. अखेर आज दीपिकानं चाहत्यांना गुड न्यूज दिली. दीपिका पादुकोणची डिलिव्हरीची तारीख ही 27 सप्टेंबर असल्याचं सांगितलं जात होतं, पण त्याआधीच अभिनेत्रीनं मुलीला जन्म दिला. दीपिका- रणवीरनं डिसेंबर 2018 मध्ये इटलीतील 'लेक कोमो' येथं लग्न केलं होतं.
चिमुकल्या पाहुणीचं आगमन : डिलिव्हरीला जाण्याआधी दीपिका आणि रणवीरनं सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. यावेळी दोघं आपापल्या कुटुंबियांबरोबर पाहायला मिळाले. लग्नाच्या सहा वर्षांनंतर दीपिका आणि रणवीरच्या घरी पाळणा हलला. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्याच दिवशी दोघांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं. त्यामुळं ऐन गणेशोत्सवाच्या काळात दोघांच्या आयुष्यात 'लक्ष्मी' आली.