मुंबई : भारतीय ग्रँडमास्टर डोम्माराजू गुकेशनं गुरुवारी जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2024मध्ये इतिहास रचला आहे. डी. गुकेशनं जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2024मध्ये चीनचा डिंग लिरेनचा पराभव करून एक ऐतिहासिक विजय मिळवला आहे. वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी डी. गुकेशनं सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनण्याचा बहुमान मिळवला आहे. या उत्तम कामगिरीबद्दल संपूर्ण देश त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहे. आता बॉलिवूड आणि साऊथ स्टार्सनं देखील डी. गुकेशचं अभिनंदन केलं आहे. बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन, साऊथ मेगास्टार चिरंजीवी, ज्युनियर एनटीआर अनुपम खेर, जॅकी श्रॉफ यांनी डी. गुकेशसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
अमिताभ बच्चन : चित्रपटसृष्टीच्या 'महानायका'नं डी. गुकेशच्या शानदार विजयानंतर अभिनंदन करत 'एक्स'वर लिहिलं, 'डी. गुकेश चेस वर्ल्ड चॅम्पियन. जगातील सर्वात कमी वयाचा चॅम्पियन असणाऱ्या तरुणाचा आम्हाला खूप अभिमान आहे. तुमच्यामुळे संपूर्ण जग भारताला सलाम करत आहे. जय हिंद.'
चिरंजीवी :चेस मास्टरचे अभिनंदन करताना, चिरंजीवीने पोस्टमध्ये लिहिलं, 'वा माझे हृदय अभिमानानं फुललं आहे, प्रिय डी. गुकेश आश्चर्यकारक कामगिरी. भारताला तुमचा अभिमान आहे. वयाच्या 18व्या वर्षी, 18वा चेस चॅम्पियन आणि इतिहासातील दुसरा भारतीय! सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आतापर्यंतचा सर्वात तरुण विश्वविजेता. भारत पुढे जात आहे. माझा भारत महान आहे.'
आर. माधवन :बॉलिवूड अभिनेता-एफटीआयआय अध्यक्ष आर. माधवननेही देशाच्या या भारतीय ग्रँडमास्टर डोम्माराजू गुकेशचं अभिनंदन केलंय. त्यानं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर डी. गुकेशचा फोटो शेअर केला आहे. यावर त्यानं कॅप्शन देत लिहिलं आहे की, 'जेव्हाही आम्ही हे करतो, तेव्हा आम्ही जिंकतो, आम्ही आता हा उत्सव साजरा करत आहोत. आम्ही प्रार्थना करतो आणि सर्वशक्तिमानचे आभार मानतो. वर्ल्ड चॅम्पियन.'
एसएस राजामौली :'आरआरआर' दिग्दर्शक एसएस राजामौलीनेही डी. गुगेशचं कौतुक करत 'एक्स'वर पोस्ट करत लिहिलं की, 'भारतानं पुन्हा आपली चाल खेळली आहे. डी. गुकेशचं जगातील सर्वात तरुण चेस चॅम्पियन बनल्याबद्दल आणि जागतिक मंचावर देशाला अभिमानचा आनंद दिल्याबद्दल अभिनंदन. जय हिंद'
ज्युनियर एनटीआर : साऊथ अभिनेता ज्युनियर एनटीआरनं डी. गुकेशला सलाम केला आहे. त्यानं 'एक्स'वर सलाम इमोजीसह लिहिलं, 'भारताचा प्रतिभावान खेळाडू आणि जगातील सर्वात तरुण बुद्धिबळ चॅम्पियन डी. गुकेशला सलाम. तुमच्या महानतेच्या प्रवासात तुम्हाला आणखी अनेक विजय मिळो. कीप साइन.'
स्टार्सनं केला प्रेमाचा वर्षाव :या स्टार्सशिवाय कंगना राणौत, अनुपम खेर, सुनील शेट्टी, कमल हसन, आयुष्मान खुराना, यांच्यासह अनेकानी डी. गुकेशवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. गुकेशनं 12 डिसेंबर रोजी सिंगापूरमध्ये वर्ल्ड चेस चॅम्पियन 2024मध्ये भाग घेतला होता. या भारतीय बुद्धिबळपटूचा सामना, डिफेंडिंग चॅम्पियन चीनचा बुद्धिबळपटू डिंग लिरेनशी झाला. गुकेशनं हुशारीनं 14व्या बाजीमध्ये लिरेनचा पराभव केला. यानंतर तो सर्वात तरुण वर्ल्ड चेस चॅम्पियन बनला. त्याच्या या शानदार विजयाचा सर्वांनाच अभिमान वाटत आहे.