महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'प्रेम नाम है मेरा, प्रेम चोप्रा' : स्वतःचंच नाव सांगणाऱ्या खलनायकाच्या प्रभावाची 65 वर्षे

Prem Chopra impact on Indian cinema : प्रेम चोप्रा यांच्या अभिनय कारकिर्दीला 65 वर्षे पूर्ण होत आहेत. 1960 मध्ये 'चौधरी कर्नेल सिंग' या चित्रपटापासून सुरू झालेला त्यांचा अभिनय प्रवास संदीप रेड्डी वंगाच्या 'अ‍ॅनिमल' पर्यंत येऊन पोहोचलाय. त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारताना त्यांचा बेरकी खलनायक कायम स्मरणात राहिला आहे.

Prem Chopra
प्रेम चोप्रा

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 29, 2024, 10:28 AM IST

Updated : Feb 29, 2024, 10:59 AM IST

मुंबई - Prem Chopra impact on Indian cinema : दिग्गज स्टार प्रेम चोप्रा यांच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला तब्बल 65 वर्षे पूर्ण झाली आहेत. पडद्यावर खतरनाक खलनायक साकारताना त्यांनी दिलेलं व्हेरिएशन केवळ अतुलनीय आहे. खरंतर अनेक खलनायक आपल्याला त्यांच्या लोकप्रिय डायलॉगमुळे स्मरणात राहतात. मात्र 'प्रेम नाम है मेरा, प्रेम चोप्रा', असं स्वतःचं नाव घेणारे प्रेम चोप्रा एकमेव खलनायक असतील. या डायलॉगचीही एक भारी कथा आहे.

राज कपूर 'मेरा नाम जोकर' चित्रपटाला मिळालेल्या बॉक्स ऑफिसवरील अपयशामुळे खचले होते. त्यानंतर त्यांनी बनवलेल्या ‘कल आज और कल’ या चित्रपटालाही यश लाभलं नाही. त्यातच त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांचंही निधन झालं होतं. त्यामुळे 1973 साली 'बॉबी' हा चित्रपट बनवताना त्यांच्याकडे फारसं बजेट नव्हतं. त्यावेळी त्यांनी ऋषी कपूर या आपल्या मुलाला घेऊन चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. नायिका म्हणून नवोदित डिंपल कपाडियाला त्यांनी संधी दिली. पैशाची बचत करण्यासाठी त्यांनी हे दोन निर्णय घेतल्यानंतर खलनायक म्हणून आपला साडू प्रेम चोप्राला बोलावून घेतलं. शूटिंग सेटवर पोहोचल्यानंतर त्यांना कळलं की आपल्या वाट्याला फक्त एकच डायलॉग आहे, 'प्रेम नाम है मेरा, प्रेम चोप्रा'. त्यांची भूमिकाही खूप छोटी होती, त्यामुळे ते नाराज झाले. पण त्यांचे मेहुणे प्रेमनाथ यांनी त्यांना राज कपूरवर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला. बॉबी या चित्रपटानं पुढे इतिहास रचला आणि प्रेम चोप्राच्या एका डायलॉगने थिएटर दणाणून गेले. गेल्या चार दशकापासून प्रेम चोप्रा जिथंही कार्यक्रमाला जातात तिथं त्यांना हा डायलॉग म्हणण्याचा आग्रह होता.

1960 मध्ये आलेल्या 'चौधरी कर्नेल सिंग' चित्रपटापासून सुरू झालेला त्यांचा अभिनयाचा प्रवास संदीप रेड्डी वंगाच्या 'अ‍ॅनिमल' पर्यंत येऊन पोहोचलाय. आजही त्यांचा स्क्रिनवरील उपस्थिती आणि त्यांच्या अभिनयानं प्रेक्षक थक्क होऊन जातात.

प्रेम चोप्रा यांनी अभिनयात पदार्पण करण्या आधी टाइम्स ऑफ इंडियामध्ये पत्रकार म्हणून सुरुवात केली होती. त्यानंतर 'शहीद', 'उपकार' आणि इतर चित्रपटांमध्ये त्यांनी आपली अभिनय क्षमता सिद्ध केली.

एस राम शर्मा दिग्दर्शित आणि मनोज कुमार, कामिनी कौशल आणि प्राण यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 1965 च्या 'शहीद' या देशभक्तीपर चित्रपटात त्यांनी सुखदेवची भूमिका केली होती. इफ्तेकार, निरुपा रॉय, प्रेम चोप्रा, मदन पुरी आणि अन्वर हुसैन यांनी सहाय्यक भूमिका केल्या होत्या.

याबद्दल एएनआयशी बोलताना ते म्हणाले की, "मला 'शहीद'मध्ये संधी देण्यात आली होती. मी त्यात सुखदेवची भूमिका केली होती. त्यामुळे माझ्याकडे खूप लक्ष वेधले गेले." शहीदमधील भूमिकेला प्रेम चोप्रा चोप्रा ‘चांगली’ भूमिका म्हणतात. "मला चांगली भूमिका हवी असल्याने मला खूप छान वाटले. त्यानंतर मुख्य ब्रेक आला, 'उपकार'. पुन्हा मनोज कुमारसोबत. मधल्या काळात मी विजय आनंदसोबत 'तीसरी मंझिल', 'वो कौन थी?', आणि 'मेरा साया', राज खोसलाचे सर्व पिक्चर्स जे प्रचंड हिट झाले होते. गाणी खूप गाजली होती. लोक टॅलेंटेड असायचे. आणि ते मिळवण्यासाठी ते खूप प्रयत्न करायचे. त्यामुळे ते सर्व छान होते. आणि सर्व काही घडू लागले."

प्रेम चोप्रा यांची अभिनय कारकीर्द अडचणींनी भरलेली होती आणि दिलीप कुमार, राज कपूर आणि देव आनंद यांसारख्या दिग्गजांमध्ये स्वत:साठी स्थान निर्माण करणे कधीही सोपे नव्हते. उत्तम लूक असूनही, जगदीश सेठी, प्रेम चोप्रा, मदन पुरी आणि जबीन जलील यांनी अभिनय केलेल्या 1960 च्या पंजाबी चित्रपट 'चौधरी कर्नेल सिंग' मध्ये मुख्य भूमिकेत येईपर्यंत प्रेम चोप्रा यांना फार मोठा ब्रेक मिळाला नाही.

टाईम्स ऑफ इंडियामध्ये वितरण विभागात काम करत असताना त्यांना पंजाबी चित्रपटात भूमिका कशी मिळाली हे सांगितले. "मला तिथे कोणीतरी पाहिलं आणि तो म्हणाला, तुम्ही माझ्यासोबत रणजीत स्टुडिओमध्ये येऊ शकता का? तो म्हणाला, ही प्रमुख व्यक्तीची भूमिका आहे, पण पंजाबी चित्रपटात आहे. गरजवंतला फार विचार करुन चालत नाही म्हणून मी म्हणालो, ते कसे वर्क आऊट होते ते पाहू. आणि तो चित्रपट होता 'चौधरी कर्नेल सिंग'. तो त्यावेळचा सर्वात मोठा हिट चित्रपट होता. आम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि पंजाबी चित्रपटांमध्ये सर्वात मोठा हिट चित्रपट दिला."

सुमारे सहा दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी 'उपकार', 'दास्तान', 'गोरा और काला' आणि कटी पतंग यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. अलीकडेच प्रेम चोप्रा यांनी 'अ‍ॅनिमल' या अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटात काम केले होते. यामध्ये रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदान्ना यांच्याही प्रमुख भूमिका होत्या.

हेही वाचा -

  1. सलमानने आपले पेटिंग्ज चाहत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आर्टफी कंपनीशी केला करार
  2. रणवीर सिंग होणार होता 'डॉन' स्टाईलमध्ये 'रफुचक्कर', चाणाक्ष पापाराझींनी कॅमेऱ्यात केले कैद
  3. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनसाठी ग्लोबल सिंगर रिहानाची टीम भारतात
Last Updated : Feb 29, 2024, 10:59 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details