मुंबई - Kartik Aaryan in Gwalior: बॉलिवूडचा सुंदर अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या आगामी 'चंदू चॅम्पियन' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यासाठी, तो त्याच्या मूळ गावी ग्वाल्हेरला पोहोचला आहे. याठिकाणी त्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं आहे. ग्वाल्हेरमधील कार्तिकचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओत तो ग्वाल्हेर विमानतळावर उतरल्यानंतर ढोल वाजवून त्याचं स्वागत केल्याचं दिसतं. यावेळी त्याला अनेकांनी घेरलं होत. कार्तिक त्याच्या आगामी चित्रपट 'चंदू चॅम्पियन'चे प्रमोशन देखील यावेळी करणार आहे.
'चंदू चॅम्पियन'चा ट्रेलर लॉन्च ग्वाल्हेर शहरात :'चंदू चॅम्पियन' या चित्रपटासाठी कार्तिकनं खूप मेहनत घेतली आहे. या चित्रपटासाठी त्यानं वजन कमी केलं होतं. याशिवाय त्यानं वर्षभर साखर खाण्याचं देखील टाळलं होतं. दरम्यान, एका व्हायरल व्हिडिओमध्ये कार्तिक हा खूप खुश असल्याचं दिसत आहे. कार्तिकबरोबर त्याचे वडील आणि 'चंदू चॅम्पियन'चे दिग्दर्शक कबीर खानही होते. दरम्यान कबीर खाननं खुलासा केला की, "कार्तिकनं 'स्टिरॉइड्सशिवाय' चित्रपटासाठी 18 किलो वजन कमी केलं होतं. यानंतर मी त्याला भेटायला गेलो होतो, तेव्हा त्यानं दुसऱ्या एका भूमिकेसाठी वजन वाढवलं होतं. यानंतर मी त्याला सांगितलं की, तुला आंतरराष्ट्रीय खेळाडूची भूमिका साकारायची आहे." प्रत्युत्तरात तो फक्त हसला आणि म्हणाला, "मी करेन सर."