कानपूर - नवाजुद्दीन सिद्दीकीच्या 'रात अकेली है पार्ट २' या चित्रपटाचं उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये शूटिंग सुरू आहे. या सेटवर अपघात झाल्यानं खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या 'रात अकेली है भाग २' या चित्रपटाचं शूटिंग कानपूर शहरातील परेड कोतवाली येथे सुरू आहे. नवाजुद्दीन शहरात आल्यामुळे सेटवर मोठा उत्साह आहे. सगळं काही सुरळीत असताना नवाजुद्दीनची गाडी कोतवाली पोलीस ठाण्याच्या भिंतीवर आदळली. या अपघातात कार चालक जखमी झाला, तर नवाजुद्दीन सिद्दीकी थोडक्यात बचावला आहे. या अपघातानंतर शूटिंग मध्येच थांबवावं लागलं. ही घटना शूटिंग सुरू असताना मंगळवारी रात्री उशिरा घडली.
थोडक्यात बचावला नवाजुद्दीन - मंगळवारी मध्यरात्री १:४५ च्या सुमारास एक दृष्य चित्रीत केलं जात होतं. यादरम्यान, कार ड्रायव्हरनं गाडी पोलीसस्टेशनच्या दिशेनं वेगात वळवली आणि त्याचं स्टीयरिंग व्हील नियंत्रणाबाहेर गेल्यानं कार थेट भिंतीवर आदळली. ही टक्कर इतकी जोरदार होती की त्याचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रॉडक्शन युनिटमधील लोकांनी धाव घेतली आणि ड्रायव्हरला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात पाठवलं. या अपघातानंतर, शूटिंग ताबडतोब थांबवण्यात आलं आणि बुधवारी कोणतंही शूटिंग झालं नाही. या संपूर्ण प्रकरणात कोतवाली पोलीस स्टेशनचे प्रभारी जगदीश पांडे म्हणाले, 'पोलीस स्टेशनच्या गेटमधून आत प्रवेश करताना गाडी थोडीशी नियंत्रणाबाहेर गेली, त्यामुळे चालक जखमी झाला, परंतु, काही वेळानं पुन्हा चित्रपटाचे चित्रीकरण झालं.'