मुंबई- 'आशिकी' या 1990 च्या दशकात आलेल्या चित्रपटामुळे प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री अनु अग्रवाल एका रस्ता अपघातात गंभीरपणे जखमी झाली होती. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरही अनेक जखमा झाल्या. अनेक काळ या वेदनादायी अवस्थेतून गेल्यानंतर तिच्या बदलेल्या चेहऱ्यामुळे तिला टीकेचा सामना करावा लागला होता. परंतु तिने स्वतःला जसे आहे तसे स्वीकारायचा निर्णय घेतला आणि इतर तथाकथित सौंदर्य जपण्यासाठी धडपडणाऱ्या नट्यांप्रमाणे कॉम्सेटिक सर्जरी करुन चेहऱ्यावर कृत्रीम सौंदर्याचा मुखवटा घातला नाही.
सध्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची तयारी जगातील महिला करत आहेत. या पार्श्वभूमीवर तिने महिलांसाठी एक संदेश पाठवून आवाहनही केलं आहे. तिनं यात म्हटलंय, " आयुष्य बदलवणाऱ्या अपघाताला सामोरे गेल्यानंतर माझ्या लूकची काहींनी खिल्ली उडवली, ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण मी माझा चेहरा आणि स्वतःला जशी आहे तसे स्वीकारले." अभिनेत्री अनु अग्रवालने स्वतःवर कॉस्मेटिक सर्जरी करण्याचा कधीही विचार केला नाही. स्वतःवरील प्रेमाला प्राधान्य देण्याचे आणि कॉस्मेटिक उपचार टाळण्याचे आवाहन तिने महिलांना केले आहे.