मुंबई - Athiya Shetty Pregnant? : हिंदी चित्रपटसृष्टीची अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज केएल राहुल जानेवारी 2023 मध्ये विवाहबंधनात अडकले होते. खंडाळा येथील सुनील शेट्टी यांच्या फार्म हाऊसवर कुटुंबीय आणि खास मित्रांच्या उपस्थितीत या जोडप्यानं सात फेरे घेतले होते. या जोडप्यानं नेहमीच त्यांचं नातं खाजगी ठेवलं आहे. सोशल मीडियावर देखील क्वचितच हे जोडपे एकमेकांचे फोटो शेअर करत असतात. दरम्यान, काही दिवसांपूर्वी एक बातमी समोर आली होती की, अथिया शेट्टी आई होणार आहे. आता बातमीबाबत सत्य जाणून घेऊया.
अथिया शेट्टी आणि केएल राहुल बनणार पालक ? : अलीकडेच अभिनेता सुनील शेट्टीनं हिंट दिली होती की, अथिया शेट्टी ही आई होणार आहे. यानंतर सोशल मीडियावर अथिया आणि केएल राहुलबद्दल अनेक बातम्या समोर आल्या होत्या. सुनील शेट्टीनं एका डान्स शोमध्ये अथिया शेट्टी आणि केएल राहुल पालक होणार असल्याचे संकेत दिल्यानंतर त्याचे चाहते खूप खुश झाले होते. सुनील शेट्टी हा एका डान्स रिॲलिटी शोमध्ये जज म्हणून गेला होता. शोची होस्ट भारती सिंगनं गंमतीत सुनीलला विचारलं होतं की तो कसा आजोबा असेल. यावर प्रतिक्रिया देताना त्यानं म्हटलं होतं की, ''होय, पुढचा सीझन येईन तेव्हा मी आजोबासारखा रंगमंचावर फिरेन.''