मुंबई - Arti Singh Sangeet Night : 'बिग बॉस 13' ची स्पर्धक-गोविंदाची भाची आरती सिंह 25 एप्रिल रोजी मुंबईतील उद्योगपती दीपक चौहानबरोबर लग्नगाठ बांधणार आहे. लग्नाआधी ती तिच्या प्री-वेडिंगचा खूप आनंद घेत आहे. 23 एप्रिल रोजी संगीत सोहळा होता, ज्यामध्ये चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीतील लोक उपस्थित होते. संगीत सोहळ्यातील नववधूचा एक व्हिडिओ समोर आला आहे, यामध्ये ती सुंदर डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये, आरती तिच्या कुटुंबाला समर्पित परफॉर्मन्स देत आहे. तिचा हा व्हिडिओ फायटर अभिनेता करण सिंग ग्रोव्हरनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
करण सिंग ग्रोव्हरनं आरती सिंहचा केला व्हिडिओ शेअर :या पोस्टच्या कॅप्शनमध्ये करणनं लिहिलं, 'खरे प्रेम शोधल्याबद्दल आरती आणि दीपिकचं अभिनंदन." करण सिंग ग्रोव्हरनं या कार्यक्रमात हजेरी लावली होती. व्हिडिओमध्ये आरती 'मुझे साजन के घर जाना है', 'आंगन गलियां चौबारा' या जुन्या गाण्यांवर थिरकताना दिसत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला आरतीच्या कुटुंबातील काही जुन्या फोटोचीही झलक दाखवण्यात आली आहे. दरम्यान आरतीनं तिच्या संगीतासाठी चमकदार सोनेरी हिरवा स्लीव्हलेस लेहेंगा परिधान केला होता. आरती आणि दीपकच्या संगीत सोहळ्याचा आनंद अनेक सेलिब्रिटींनी लुटला.