मुंबई Chaturanga Suvarna Ratna Samman :कोकण खेड्यातल्या आपल्या शाळांसाठी आपण काहीतरी शालोपयोगी उपक्रम करूया अशा छोट्याशा उद्देशाने १९७४ च्या अक्षय्य तृतीयेला सुरू झालेल्या चतुरंग प्रतिष्ठान या सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक संस्थेनं विविधांगी असे ६१ उपक्रम हाती घेतले. ही वाटचाल अशी होत गेली की यावर्षी अक्षय्य तृतियेला पन्नास वर्षे पूर्ण झाली. मुंबई पाठोपाठ डोंबिवली, पुणे, चिपळूण, रत्नागिरी, गोवा असा सहा केंद्रांवर आपला पसारा संस्थेनं वाढवला. महाराष्ट्रात सर्वदूर सुमारे २४० हून अधिक स्थळ - ठिकाणांचा वापर करीत ५० वर्षात १८०० हून अधिक कार्यक्रमांचा टप्पा संस्थेनं पार केला आहे. अर्थातच यासाठी त्यांना भरभरून सहकार्य पाठबळ पाठिंबा मिळाला तो सर्व क्षेत्रांतील असंख्य लोकप्रिय कलावंतांचा! नामवंत, गुणवंत अशा अनेक मान्यवरांचा! चतुरंग उभी राहायला, प्रस्थापित करायला ज्या-ज्या दिग्गजांनी, त्या त्या काळात चतुरंगला आधार दिला त्यांच्या प्रति जाहीर कृतज्ञता व्यक्त करणारे आनंद सोहळे प्रतिष्ठानने मुंबई खेरीज रत्नागिरी, चिपळूण, गोवा, डोंबिवली, पुणे या अन्य केंद्रांवर मोठ्या झोकदारपणे आणि दिमाखात साजरे केले. आता सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा मुंबईमध्ये भव्य प्रमाणावर करण्याचे योजिले आहे. या सोहळ्याचा केंद्रबिंदू असणार आहे चतुरंग सुवर्णरत्न सन्मान.
११ नामवंतांचा सत्कार - चतुरंगच्या हातून पार पडलेले सुमारे १८०० हून अधिक कार्यक्रम हे ज्यांच्या कला प्रेरणेने, प्रोत्साहनाने चतुरंगला साकार करता आले अशा १४ विद्या ६४ कलांपैकी किमान ११ क्षेत्रांतील नामवंत - गुणवंतांचा जाहीर सन्मान आपल्या हातून घडावा अशी योजना आहे. यातील किमान ११ जणांच्या उत्तुंग, लक्षवेधी, देदिप्यमान कारकिर्दीबद्दल आपल्या हातून त्यांचे जाहीर वंदन - पूजन घडावे या सदिच्छातून सुवर्णरत्न सन्मानाची संकल्पना पुढे आली. या सन्मानासाठी पं. उल्हास कशाळकर (गायन), पं. हरिप्रसाद चौरसिया (वादन), अशोक पत्की (संगीत दिग्दर्शन), महेश एलकुंचवार (साहित्य), दिलीप प्रभावळकर (नाटक), रोहिणी हट्टंगडी (चित्रपट), वासुदेव कामत (चित्रकला), चंदू बोर्डे (क्रीडा), डॉ. अनिल काकोडकर (संशोधन) बाबासाहेब कल्याणी (उद्योजकता), मेजर महेश कुमार भुरे ( राष्ट्रीय सुरक्षा) अशी अकरा क्षेत्रातील मान्यवरांची निवड करण्यात आली आहे.