मुंबई - Black Movie : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्या 2005 मध्ये रिलीज झालेल्या 'ब्लॅक' चित्रपटाला 19 वर्षे पूर्ण होत आहेत. अलीकडेच अमिताभ यांनी त्यांच्या सोशल मीडियावर या चित्रपटाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या चित्रपटाचा व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिलं, ''ब्लॅक रिलीज होऊन 19 वर्षे झाली आहेत आणि आज आम्ही नेटफ्लिक्सवर पहिले डिजिटल रिलीज साजरे करत आहोत! देबराज आणि मिशेल यांचा प्रवास आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.'' चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'ब्लॅक' चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता.
'ब्लॅक' चित्रपट झाला ओटीटीवर रिलीज : 'ब्लॅक' हा चित्रपट अनेकांना खूप आवडला होता आणि याचे सर्व थरातून कौतुक झालं होतं. आजही लोकांकडून राणी आणि अमिताभ यांच्या अभिनयाची प्रशंसा केली जाते. आता निर्मात्यांनी या चित्रपटाला 19 पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ओटीटीवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. रविवारी, 4 फेब्रुवारी रोजी, अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी स्टारर चित्रपट 'ब्लॅक'च्या पहिल्या डिजिटल रिलीजची घोषणा करण्यात आली. या चित्रपटात बिग बींनं शिक्षक देबराजची भूमिका साकारली होती. तर राणी मुखर्जीने बहिरेपणा आणि अंधत्वाशी संघर्ष करणाऱ्या मिशेलची भूमिका साकारली होती.