मुंबई - Amitabh Bachchan : बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चननं इंस्टाग्रामवर भारतीय बुद्धिबळ संघाचे, 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन केलंय. भारतीय संघानं रविवारी, 22 सप्टेंबर रोजी स्लोव्हेनियाविरुद्धच्या अंतिम फेरीनंतर खुल्या गटात पहिलं सुवर्णपदक जिंकलंय. आता याबद्दल अमिताभ बच्चन यांनी पोस्टमध्ये आपला अभिमान आणि आनंद व्यक्त केला आहे. संघाच्या विजयाचे फोटो त्यांनी शेअर केले आणि एका सुंदर संदेशासह कॅप्शन लिहिलं, 'बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताचा मोठा विजय. बुद्धिबळपटूंनो, संपूर्ण भारत तुमचा कृतज्ञ आहे. तिरंगा फडकवताना आमची छाती अभिमानानं फुलते.' 81 वर्षीय अमिताभची ही पोस्ट भारत चॅम्पियन झाल्यानंतर राष्ट्रीय अभिमान दर्शवते.
बुद्धिबळमधील ऐतिहासिक विजयानंतर अमिताभ बच्चनची पोस्ट :अमेरिकेनं कझाकस्तानला 2-2 असे बरोबरीत रोखून टायब्रेकची गरज संपवून संघाचा विजय निश्चित केला. कझाकस्तान जिंकला असता तर स्पर्धा अतिरिक्त फेरीत न्यावी लागली असती. भारताच्या यशाचे श्रेय डी गुकेश, अर्जुन एरिगेसी आणि आर. प्रग्गनानंद यांच्या उत्कृष्ट कामगिरीला जाते. यांनी 11व्या आणि शेवटच्या फेरीत आपापले सामने जिंकले. त्यांनी भारताला या स्पर्धेत पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. जागतिक चॅम्पियनशिपचे चॅलेंजर डी. गुकेशनं भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, विशेषत: स्लोव्हेनियाच्या व्लादिमीर फेडोसेव्हविरुद्धचा त्याचा शानदार विजय खूप विशेष होता.