हैदराबाद - साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'पुष्पा 2: द रुल' चित्रपटाची लांबी वाढवण्यात येणार आहे. पूर्वीपेक्षा 20 मिनीटांची अधिक दृष्ये यात पाहायला मिळतील. अल्लू अर्जुनच्या तमाम चाहत्यांसाठी ही संक्रांतीची नवी भेट 'पुष्पा 2' च्या निर्मात्यांनी दिली आहे.
'पुष्पा 2' च्या बॉक्स ऑफिस कलेक्शननं अनेक विक्रम मोडीत काढले आहेत, परंतु जागतिक कमाईचा 2073 कोटी कमाईचा दंगल चित्रपटाचा विक्रम अजूनही अबाधित आहे. पुष्पाची कमाई 1830 कोटी पर्यंत पोहोचली आहे. भारतात कमाईचा इतिहास रचणारा 'पुष्पा 2' हा चित्रपट आधीच 3.15 तासांचा एक लांबलचक चित्रपट आहे. आता यामध्ये आणखी 20 मिनीटांची भर पडणार असल्यामुळे हा चित्रपट आता 3 तास 35 मिनीटांचा होणार आहे.
तेलुगू भाषिक लोक संक्रातीचा सण मोठ्या उत्साहात साजरे करतात. कोकणातील लोक जसे गणेश उत्सवात कुठेही असले तरी घरी एकत्र येतात, त्याप्रमाणेच आंध्र प्रदेशमधील गावागावातून कामाच्या निमित्तानं बाहेर गेलेले लोक संक्रांतीसाठी घरी परततात. या सणाच्या पार्श्वभूमीवर 11 जानेवारीपासून 'पुष्पा 2' चित्रपटाची रीलोडेड आवृत्ती प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटानं गेल्या 32 दिवसांत जगभरात 1830 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
'पुष्पा 2' मध्ये अतिरिक्त फुटेज जोडल्याची घोषणा करताना, निर्मात्यांनी लिहिलंय की, "पुष्पा2 - द रूल रीलोडेड आवृत्ती २० मिनिटांच्या जोडलेल्या फुटेजसह 11 जानेवारीपासून सिनेमागृहांमध्ये दिसेल."
खरंतर संक्रांतीच्या निमित्तानं राम चरणचा 'गेम चेंजर' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अशा परिस्थितीत आता तेलुगू प्रेक्षक 'गेम चेंजर'साठी गर्दी करणार हे उघड आहे. अशा वेळी पुन्हा एकदा प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचण्यासाठी अल्लू अर्जुनच्या चित्रपटासाठी निर्मात्यांनी 'नवी गेम चेंजर चाल' खेळली आहे. यातून दोन गोष्टी घडू शकतील एक म्हणजे 'गेम चेंजर'चे प्रेक्षक या दोन्ही चित्रपटांना पाहतील आणि दुसरं म्हणजे 'दंगल' चित्रपटाचं अबाधित राहिलेला 2073 कोटींचा जगभरातील कमाईचा विक्रम 'पुष्पा 2' कडून मागे टाकला जाऊ शकेल.