हैदराबाद - 'पुष्पा 2' चा सुपरस्टार अल्लू अर्जुननं 7 जानेवारी 2025 रोजी सिकंदराबाद येथील KIMS हॉस्पिटलला भेट दिली. या भेटीत त्यानं 4 डिसेंबर 2024 रोजी संध्या थिएटरमध्ये 'पुष्पा 2' च्या प्रीमियरच्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत गंभीर जखमी झालेल्या आठ वर्षीय श्रीतेजा या मुलाची विचारपूस केली. या चेंगराचेंगरीच्या घटनेत रेवती नावाची महिला मृत्यूमुखी पडली होती तर तिचा मुलगा श्रीतेजा हा गंभीर जखमी झाला होता. आता त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तेलंगणा राज्य चित्रपट विकास महामंडळाचे अध्यक्ष दिल राजू यांच्याबरोबर अल्लू अर्जुननं रुग्णालयात सुमारे 30 मिनिटं घालवली. जखमी श्रीतेजाची प्रकती सुधारत असून अल्लू अर्जुननं त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. हा जखमी मुलगा गेल्या तीन आठवड्यापासून व्हेंटिलेटरवर होता. गेली 20 दिवस तो काही प्रतिसाद देत नव्हता मात्र, 24 डिसेंबरला त्यानं पहिल्यांदा प्रतिसाद दिल्यानंतर पुढील उपचार त्याच्यावर सुरू आहेत.
अल्लू अर्जुनला या जखमी मुलाला भेटण्याची इच्छा होती. मात्र पोलिसांच्या निर्देशांमुळे त्याला विलंब झाला. सुरुवातीला, त्याच्या जामीन अटींचा भाग म्हणून चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात तक्रार करण्याच्या न्यायालयाच्या आदेशाचे पालन केल्यानंतर त्यानं 5 जानेवारीला भेट देण्याची योजना आखली होती. परंतु, रामगोपालपेट पोलिसांनी अल्लू अर्जुनला रुग्णालयाच्या कामकाजात व्यत्यय आणू शकणारे मीडिया आणि होणारी गर्दी टाळण्यासाठी भेटीचा पुनर्विचार करण्याचा सल्ला देणारी नोटीस जारी केली होती. सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी गोपनीयतेची गरज आणि त्यांच्या भेटीची व्यवस्था करण्यासाठी 6 जानेवारी रोजी दुसरी नोटीस जारी करण्यात आली.
या घटनेबाबत सुरू असलेल्या कायदेशीर प्रक्रियेदरम्यान ही भेट झाली आहे. 13 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या अटकेनंतर न्यायालयानं अल्लूला 4 जानेवारी 2025 रोजी नियमित जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या लक्षात आलं की ही घटना अपराधी हत्या नाही आणि अल्लू अर्जुनला तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले होते. यासंबंधी तेलंगणा उच्च न्यायालयासमोर एक याचिका प्रलंबित आहे, पुढील सुनावणी 21 जानेवारी 2025 रोजी होणार आहे.
अभिनेता अल्लुू अर्जुननं पीडितेच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली आहे. त्याचे वडील, चित्रपट निर्माता अल्लू अरविंद यांनी रेवतीच्या कुटुंबासाठी 2 कोटी रुपयांचा मदत केली आहे, तर अल्लू अर्जुननंही स्वत: 1 कोटी रुपये दिले आहेत. 'पुष्पा 2' च्या निर्मात्यांनीही 50 लाख रुपये मदत दिली आहे. शिवाय पुष्पाचे दिग्दर्शक सुकुमार यांनी दुःखी कुटुंबाला मदत करण्यासाठी आणखी 50 लाख रुपये दिले आहेत.