मुंबई - अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या दिसण्यावरुन अफवांना ऊत आला होता आणि तिनं कॉस्मेटिक शस्त्रक्रिया केल्याची चर्चा सोशल माध्यमातून सुरू झाली होती. हे सर्व दावे आलियानं खोडून टाकले आहेत. आलियानं तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये याबद्दल सविस्तर लिहून आणि व्हिडिओ पोस्ट करुन टीकाकारांची बोलती बंद करण्याचा प्रयत्न केला आहे. "कोणीही जेव्हा कॉस्मेटिक शस्त्रक्रियेच्या मार्ग निवडतो तेव्हा ती त्याच्या शरीरासाठी त्यानं केलेली निवड असते", असं आलियानं म्हटलंय.
आलिया भट्ट इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट (ANI) "पण हे हस्यास्पदच्याही पलीकडंचं आहे. माझं बोटाक्स उपचार चुकीचे झाल्याचा दावा या रँडम व्हिडिओतून केला जात आहे. खरंतर हा तुमचा मानवी चेहऱ्याचा हायपरक्रिटिकल, मायक्रोस्कोपिक निर्णय आहे," असं आलियानं म्हटलंय. कोणत्याही पुराव्याशिवाय सुरू असलेल्या या वायफळ चर्चावर तिनं संताप व्यक्त केला आहे. टीकाकारांच्या या विचित्र पद्धतीबद्दल आणि निराधार विधानांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
या चर्चा आणि अफवा यांचा तरुणांवर हानिकारक परिणाम होऊ शकतात आणि अशा प्रकारच्या गोष्टी ते गंभीरपणे घेऊ शकतात, असंही तिनं म्हटलंय. हे जे सर्व सुरू आहे ते केवळ प्रसिद्धीसाठीचा भोंगळपणा असल्याची ती म्हणाली. इतरांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करावा असंही तिनं सूचित केलं आहे.
सध्या, अभिनेत्री आलिया भट्ट सहकलाकार शर्वरी वाघ हिच्या बरोबर काश्मीरच्या निसर्गरम्य भागात तिच्या आगामी 'अल्फा' चित्रपटाच्या शूटिंगमधून गुंतली आहे. अलीकडेच तिनं या ठिकाणचे आनंदी क्षण चाहत्यांसाठी शेअर केले होते.
शिव रवैल दिग्दर्शित, 'अल्फा' यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा एक नवा पायंडा पाडण्यासाठी सज्ज आहे. हा चित्रपट डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. आलियाचा नुकताच आलेला 'जिगरा' हा चित्रपट 11 ऑक्टोबरला थिएटरमध्ये दाखल झाला आहे. आलिया भट्ट आणि करण जोहर यांच्या धर्मा प्रॉडक्शनने सहनिर्मित केलेल्या या अॅक्शन थ्रिलर चित्रपटामध्ये आलिया एका बहिणीच्या अनोख्या भूमिकेत झळकली आहे. अभिनेता वेदांग रैनानं तिच्या भावाची व्यक्तिरेखा साकारली असून यामध्ये ती भावाला परदेशातील तुरुंगातून सोडवते.