मुंबई - VIRAL VIDEO :बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सरफिरा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'सरफिरा' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 12 जुलै रोजी प्रदर्शित झाला होता. दरम्यान साऊथचा सुपरस्टार कमल हासनचा 'इंडियन 2' हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. गेल्या पाच दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर कमाईसाठी दोन्ही चित्रपटांमध्ये स्पर्धा सुरू आहेत. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार एका स्टंटमनचा जीव वाचवताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओतील अक्षय कुमारचे शौर्य पाहून चाहते त्याचे कौतुक करत आहेत.
अक्षयनं वाचवले स्टंटमनचे प्राण :सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये 'द कपिल शर्मा शो'मध्ये कॉमेडियन आणि अभिनेता अली अजगर आणि त्याच्याबरोबर दोरीनं बांधून हवेत लटकत असलेला माणूस हा अचानक बेशुद्ध होऊन दोरीवर पडतो. तो तसाच हवेत लटकत राहतो. हे पाहून अली अजगर पूर्णपणे हादरतो आणि त्याचवेळी अक्षय कुमार आणि संपूर्ण क्रू टीम त्याचा जीव वाचवण्यासाठी पोहोचतात. अक्षय प्रथम या व्यक्तीचे डोके पकडतो आणि त्याला शुद्धीवर आणतो. मग हळूहळू त्याला खाली उतरवतो. अक्षय कुमारच्या या धाडसामुळे त्याचे चाहते त्याला खिलाडी कुमार म्हणत आहेत.