मुंबई - अक्षय कुमार आणि वीर पहाडिया यांच्या भूमिका असलेला 'स्काय फोर्स' हा चित्रपट प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चित्रपटातील कलाकार खूप मेहनत घेत आहेत. सलमान खान होस्ट करत असलेल्या सर्वात लोकप्रिय टीव्ही रिअॅलिटी शो 'बिग बॉस १८' मध्येही 'स्काय फोर्स' टीमनं हजेरी लावली होती. यावेळी शोमध्ये फक्त वीर पहाडिया दिसला होता. सलमान खान सेटवर उशीरा आल्यानं अक्षय कुमार निघून गेला, अशा चर्चा झाल्या होत्या. सलमानबाबत आणि सैफ अली खानवर झालेल्या हल्ला प्रकरणी अक्षय कुमार काय म्हणाला हे जाणून घ्या.
तर, वीर पहारिया आणि 'स्काय फोर्स' टीम जेव्हा बिग बॉस १८ मध्ये पोहोचली होती तेव्हा त्यांच्याशी चर्चा करताना सलमान म्हणाला की, "मी थोडा उशीरा पोहोचलो. पण अक्षयला एका फंक्शनसाठी जायचं असल्यानं तो निघून गेला. पण तुम्ही त्याला सांगा की शोमध्ये तर तू आला नाहीस पण माझा सिनेमा जरुर बघ." या घटनेमुळं अक्षय आणि सलमानमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. याचं स्पष्टीकरण देताना अक्षय म्हणाला, "त्याला इतका उशिरा आला नव्हता, मी सेटवर आधी पोहोचलो होतो, तो थोडा उशिरा आला, त्याचे काही वैयक्तिक काम होतं, आम्ही याबद्दलही बोललो, सलमानशी बोलून मी तिथून निघालो, वीरनं सलमानबरोबर शूट केलं." सलमाननं हे स्पष्ट करून सांगितलं की, ''अक्षय वक्तशीर आहे आणि तो त्याची सर्व कामं वेळेवर करतो.''