मुंबई - घाटकोपर येथील गुजराथी बहुल सोसायटीमध्ये प्रचारासाठी जाणाऱ्या मराठी उमेदवाराला अटकाव करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर मनोरंजन जगतातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपला संताप व्यक्त केला होता. यानंतर मराठी सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेता आणि निर्माता मंगेश देसाई यांनीही रेणुका शहाणे यांचं समर्थन करत मुंबईत मराठी लोकांबाबत सुरू असलेल्या या भेदभावाला विरोध केला.
याबाबत बोलताना मंगेश देसाई म्हणाले, "मुळात हे अत्यंत चुकीचं आहे. अशा प्रकारे मराठी लोकांबद्दल वागल्यास भेदभावाचं वातावरण तयार होईल. राज्याचेही तुकडे पडतील. ही अतिशय चिंतेची गोष्ट आहे. आपल्याच घरात येऊन आपल्यालाच हक्क नाकारल्यासारखा हा प्रकार आहे. मुंबईत मराठीसह अनेक भाषा बोलणारे लोक गुण्या गोविंदानं राहतात. यात गुजराती समाजही आहे. आजवर दोन समाजात कधीच तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला नाही. त्यामुळे मराठी लोकांना सोसायटीत येऊ न देणं, मराठी माणूस आहे म्हणून त्याला घर भाड्यानं न देणं, असले प्रकार वाईट आहेत. परवा घाटकोपरमध्ये घडलेला प्रकारही खूप चुकीचा होता."
रेणुका शहाणे यांनी सोशल मीडियावर भूमिका मांडणारी पोस्ट लिहिल्यानंतर काही जणांनी तिच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला. याबद्दल विचारलं असता मंगेश देसाई म्हणाले की, "रेणुकांच्या म्हणण्यात काय चुकीचं आहे. विरोध करणारे काय कशालाही करतात. त्यांचं त्यांनाच कळत नाही की आपण काय करतोय. पण मुंबईत मराठी भाषेबद्दल, माणसांबद्दल कोणही अनादर करु नये, असं मला प्रामाणिकपणे वाटतं."
अभिनेता मंगेश देसाई सध्या निर्माता म्हणून 'धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे-भाग 2' या चित्रपटाच्या निर्मितीत व्यग्र आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या भागाला महाराष्ट्रात उदंड प्रतिसाद मिळाला होता. आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचा पुढच्या भागाचे चित्रीकरण पूर्ण झालं आहे. येत्या जुलै नंतर या चित्रपटाचं प्रदर्शन करण्याची तयारी करत असल्याचं देसाई यांनी सांगितलं.