हैदराबाद : पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुन याला चेंगराचेंगरी प्रकरणात अटक केल्यानंतर त्याला रात्रभर कारागृहात राहावं लागलं. मात्र आज सकाळी अल्लू अर्जुन याची सुटका झाल्यानंतर या प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल अल्लू अर्जुन यानं त्यांचे आभार मानले. मात्र त्यानंतर पीडित महिलेच्या पतीनं अल्लू अर्जुन याच्याविरोधातील तक्रार मागे घेतली. त्यामुळे रात्रभर कारागृहात राहावं लागलेल्या अल्लू अर्जुनसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.
अभिनेता अल्लू अर्जुन म्हणाला दुर्दैवी घटना :पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान झालेल्या चंचलगुडा चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुन याला रात्रभर कारागृहात ठेवण्यात आलं. आज सकाळी बाहेर आल्यानंतर अल्लू अर्जुन यानं माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी अल्लू अर्जुन यानं चाहत्यांचे आभारही मानले. आपण दिलेल्या पाठिंब्याबद्दल आपणा सर्वांचे आभार, काळजी करण्यासारखं काही नाही. मी ठिक आहे. मी कायद्याचं पालन करणारा नागरिक आहे. त्यामुळे मी पोलिसांना शक्य तेव्हढं सहकार्य करीन. चंचलगुडा चेंगराचेंगरी ही दुर्दैवी घटना आहे. त्यामुळे पीडित कुटुंबीयांचं झालेलं नुकसान भरुन न येणारं आहे. या प्रकरणी मी पुन्हा शोक व्यक्त करतो, असं अल्लू अर्जुन यानं स्पष्ट केलं. यावेळी त्यानं त्याच्या चाहत्यांना हात जोडून अभिवादनही केलं.