मुंबई - Anu Aggarwal :'आशिकी' फेम अनु अग्रवाल अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. काही चाहत्यांच्या मनात एक प्रश्न अजूनही कायम आहे की, ती आतापर्यत चित्रपटामध्ये का दिसली नाही. दरम्यान अनु अग्रवाल आणि राहुल रॉय स्टारर 'आशिकी' हा चित्रपट खूप हिट झाला होता. यानंतर राहुल रॉय आणि अनु अग्रवाल रातोरात स्टार बनले होते. त्यानंतर अनुनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. मात्र ती प्रेक्षकांमध्ये आपली जादू दाखवू शकली नाही. यानंतर अनु अग्रवालच्या आयुष्यात एक वेगळे वळण आलं. 1999 मध्ये अनु अग्रवाल रोड अपघाताची शिकार झाली. या अपघातात अनू अग्रवालनं तिची अनेक वर्षाची प्रसिद्धी गमावली. या अपघातानंतर ती जवळपास महिनाभर कोमात राहिली.
अनु अग्रवाल झाला होता रोड अपघात : अनुवर जवळपास 3 वर्षे उपचार सुरू होते. यानंतर ती काही वर्षानंतर बरी झाली, मात्र या अपघातात तिचा चेहरा खूपच विद्रूप झाला. अनुचा चेहरा इतका खराब झाला होता की, तिचा चेहरा देखील ओळखणे कठीण झाले होते. तेव्हापासून अनु फिल्मी जगापासून दूर राहिली. आता तिला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतायचे आहे. अनु अग्रवालनं एका मुलाखतीत सांगितलं की, तिला चित्रपटसृष्टीत परतायचे आहे. तिनं आता बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक आणि चित्रपट निर्मात्यांना अभिनयाचं काम मागितलं आहे. अनुला जेव्हा विचारण्यात आलं की ती बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यासाठी किती प्रयत्न करत आहे यावर तिनं म्हटलं, "मला सर्व चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांना काम मागायचे आहे. तुम्ही माझ्याशी इन्स्टाग्रामवरही संपर्क साधू शकता. मी चित्रपट आणि ओटीटीवर काम करण्यासाठी उत्सुक आहे."