कोल्हापूर - Canada car story : सोशल मीडियाच्या जगात कोण काय करेल याची शाश्वती नाही. आता हेच बघा ना मूळचा कोल्हापूरचा आणि सध्या कॅनडामध्ये असलेल्या तरुणानं आपल्या आलिशान कारवर चक्क फॉलोअर्सची नावं लिहिली आहेत. युट्युबर गौरव मुडेकर असं या तरुणाचं नाव असून सुमारे 50 हजार फॉलोअर्स असलेल्या गौरवच्या या कृतीनं त्याला फॉलो करणाऱ्या अनेकांना त्याच्या कृतीतून सुखद धक्का दिलाय. नोकरी निमित्त कॅनडामध्ये राहत असलेल्या कोल्हापूरच्या तरुणानं त्याच्या सोशल मीडियावरील फॉलोअर्सची नावं स्वतःच्या फोर्ड मस्टैंग गाडीवर लिहिली आहेत. हजारो फॉलोअर्सची नावं त्यानं आपल्या लाल रंगाच्या फोर्ड मस्टैंग गाडीवर लिहल्यानंतर, तो आता चर्चेत आला आहे.
चाहत्यांची नाव पांढऱ्या अक्षरात कारवर : गौरवचे इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर हजारो फॉलोअर्स आहेत. यातील अनेकांची नावं त्यानं आपल्या गाडीवर पांढऱ्या अक्षरात लिहिली आहेत. विशेष म्हणजे सोशल मीडियावर असलेल्या आपल्या चाहत्यांना, आपल्या कृतीतून गौरवनं एक सन्मान दिला आहे. 2015 पासून शिक्षणाच्या निमित्तानं कोल्हापुरातून कॅनडाला गेलेल्या गौरवनं आपलं एमबीएच शिक्षण कॅनडात पूर्ण करून तिथेच नोकरी करण्याचा निर्णय घेतला. एका खासगी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर असलेल्या गौरवनं सोशल मीडियावर कॅनडातील लाइफस्टाइल, पर्यटन स्थळे, खाद्यसंस्कृतीचे ब्लॉग आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून करण्याला सुरुवात केली आणि बघता बघता त्याच्या चाहत्यांमध्ये वाढ होत गेली. आता सुमारे 50 हजार चाहते सोशल मीडियावर त्याला फॉलो करतात. या चाहत्यांना सन्मान म्हणून काही निवडक चाहत्यांची नावे गौरवनं आपल्या आलिशान कारवर पांढऱ्या मार्करने लिहिली.