मुंबई - shah rukh khan : बॉलिवूडचा 'बादशाह' शाहरुख खानला नुकतेच स्वित्झर्लंडमधील लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये सम्मानित करण्यात आलं होतं. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्याला पारडो अल्ला कॅरीरा एस्कोना-लोकार्नो टूरिस्मो पुरस्कार देण्यात आला असून यादरम्यान शाहरुखनं, त्याच्या बहुप्रतीक्षित आगामी 'किंग' चित्रपटाची पुष्टी केली. त्यानं चित्रपटाविषयी एक रोमांचक माहितीही यावेळी शेअर केली. लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलदरम्यान किंग खाननं लाइव्ह सेशनमध्येही भाग घेतला होता. लाइव्ह सेशनमध्ये त्यानं प्रेक्षकांशी संवाद साधला. यावेळी शाहरुखनं पुष्टी केली की, तो त्याचा आगामी चित्रपट सुजॉय घोषच्या 'किंग' चित्रपटासाठी काम करत आहे.
शाहरुखचा आगामी चित्रपट : शाहरुखनं असेही सांगितलं की, सुजॉय घोषच्या आगामी चित्रपटामध्ये प्रेक्षकांना खूप ॲक्शन पाहायला मिळणार आहे. या चित्रपटासाठी तो खूप मेहनत घेत असून चित्रपटातील भूमिकेसाठी, तो वजनावरही काम करत आहे. आगामी चित्रपटाबद्दल माहिती देताना त्यानं म्हटलं, "ॲक्शन अवघड आहे, तुम्हाला त्याचा सराव करावा लागतो, ते शिकावे लागेल आणि काही धोकादायक स्टंट डबल्सही करावे लागतात. माझ्याकडे काही चांगले लोक आहेत, मात्र तुम्हाला काही प्रामाणिकपणे विकायचे असेल तर त्यासाठी 80 टक्के स्वत: काम करावे लागते. नाहीतर ते योग्य होत नाही." यानंतर 'किंग खान' गंमतीनं म्हणाला, "मी पडद्यावर छान दिसत असलो तरी शूटिंग करताना मला वेदना होतात, हे ग्लॅमरस नाही."