कोल्हापूरSachin suryawanshi Interview :कोल्हापूरजिल्ह्यालामर्दानी खेळ आणि शिवकालीन युद्धकलेचा वारसा आहे. युगपुरुष छत्रपती शिवरायांनी याच कलेचा वापर करून प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम केलं होतं. मात्र कालांतराने ही कला लोप पावत चालली आहे. या कलेचं संवर्धन व्हावं यासाठी कोल्हापूरचे सचिन सूर्यवंशी यांनी 'वारसा' या माहितीपटाची निर्मिती केली.
मोबाईल कॅमेऱ्यावर चित्रित केलेल्या या माहितीपटाला भारतीय चित्रपट सृष्टीतील मानाचा मानला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. यानंतर दिग्दर्शक सचिन सूर्यवंशी यांनी हा पुरस्कार मी शिवरायांच्या मावळ्यांना तसेच ही युद्धकला जपलेल्या सर्व खेळाडू आणि तालमींना अर्पण करतो, अशी भावना व्यक्त केली. 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
असा बनला माहितीपट :मर्दानी खेळ म्हणजे शिवकालीन युद्धकला! या युद्धकलेच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. महाराजांचे मावळे मर्दानी खेळात निपुण होते. हा युद्धकलेचा वारसा जपण्यासाठी कोल्हापुरातील स्थानिक प्रयत्न करत आहेत, हे या माहितीपटात दाखवण्यात आले आहे. वस्तादांच्या आणि खेळाडूंच्या मुलाखती, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं असं या 25 मिनिटांच्या माहितीपटाचे स्वरुप आहे. कोल्हापूरच्या कला आणि क्रीडाविश्वासाठी ही मोठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. फुटबॉलवेड्या कोल्हापुरात मर्दानी खेळाचे आखाडे अजूनही तग धरून आहेत. मर्दानी खेळाडू आणि त्यांना घडविणारी वस्ताद मंडळी स्वतःच्या खिशाला झळ लावून हा खेळ जपत आहेत. ते केवळ शिवरायांवरील प्रेमापोटीच करत आहेत. कोल्हापुरातील अनेक पेठांमध्ये अनेक शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक करतानाचे चित्र दिग्दर्शक सचिन सूर्यवंशी यांनी पाहिलं होतं. यातूनच मर्दानी खेळांचा हा वारसा जपण्यासाठी या कलेवर माहितीपट बनवण्याची संकल्पना त्यांना सुचली. पुढे या संकल्पनेतून 'वारसा' हा माहितीपट आकाराला आल्याचं सूर्यवंशी यांनी सांगितलं.