महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

गोव्यात 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात, स्टार्सचा भरला मेळावा... - FILM FESTIVAL

55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमात अनेक स्टार्सनं आतापर्यंत हजेरी लावली आहे.

55th International Film Festival
55वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (iffigoa photo - instagram)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 21, 2024, 11:00 AM IST

मुंबई -55व्या 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया' (इफ्फी) हा कार्यक्रम बुधवारी 20 नोव्हेंबरपासून गोव्यातील पणजी येथे सुरू झाला आहे. या कार्यक्रमाची सुरुवात श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर प्रसिद्ध संस्कृत श्लोक 'अच्युतम केशवम् राम नारायणम्' या गीतानं झाली. चित्रपट महोत्सवातील चित्रपटांच्या प्रदर्शनाची सुरुवात दिग्दर्शक मायकेल ग्रेसीच्या जगभरात गाजलेल्या 'बेटर मॅन' या चित्रपटाच्या प्रदर्शनानं झाली. इफ्फीमध्ये यावर्षी 19 चित्रपटांचे आंतरराष्ट्रीय प्रीमियर, 43 चित्रपटांचे आशियाई प्रीमियर आणि 109 चित्रपटांचे भारतीय प्रीमियर होईल. यावर्षीपासून देशातील युवा चित्रपट दिग्दर्शकांसाठी विशेष पुरस्कारही सुरू करण्यात आला आहे. 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान रंगणाऱ्या इफ्फी महोत्सवात अनेक चित्रपट आणि वेब सीरीज दाखविण्यात येणार आहे.

गोव्यात लागला स्टार्सचा मेळावा :'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया'मध्ये बॉलिवूड आणि आंतरराष्ट्रीय कलाविश्वामधील नामांकित व्यक्ती सहभागी होतात. इफ्फी कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी, दिग्दर्शक शेखर कपूर देखील हजर होते. या कार्यक्रमादरम्यान ते कलेविषयी बोलतानाही दिसले. याशिवाय इफ्फी कार्यक्रमात शाहिद कपूरचा भाऊ अभिनेता ईशान खट्टरही आपल्या वेगळ्या अंदाजात दिसला. या खास सोहळ्याला अभिनेत्री अंकिता लोखंडे पती विकी जैनबरोबर पोहोचली. विकी 'फौजी 2' मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. याशिवाय या कार्यक्रमात अभिनेता रणदीप हुड्डा देखील सहभागी झाला. तसेच बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा देखील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिसली. यावेळी ती तिच्या ' मिसेज' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली होती. सान्याच्या या आगामी ' मिसेज'चं चित्रपट महोत्सवात भव्य प्रीमियर होत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता अभिषेक बॅनर्जी आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर करत आहेत. सूत्रसंचालन करताना अभिषेक आणि भूमी यांनी भरपूर विनोद वापरून तेथे उपस्थित असणाऱ्या व्यक्तीचं खूप मनोरंजन केलं.

5 वेब सीरीजला नामांकन : यंदा या पुरस्कारासाठी 5 वेब सीरीजला नामांकन मिळाले आहे. याशिवाय देशभरातील 10 नामांकित ओटीटी कंपन्यांनी या पुरस्कारांसाठी अर्ज दाखल केला होता. यावेळी या कार्यक्रमात नेटफ्लिक्सवरील 'कोटा फॅक्टरी' आणि 'काला पानी' वेब सीरीज, 'सोनी लिव्ह' वाहिनीवरील 'लंपन' ही मराठी वेब सीरीज, 'प्राईम व्हिडिओवरील 'ज्यूबिली' आणि 'झी 5'वरील तमिळ वेब सीरीज 'अयाली' अशा पाच वेब सीरीजला नामांकन देण्यात आले आहे. या पाचपैकी सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या वेब सीरीजला 10 लाख रुपये रोख पुरस्कार स्वरूपात मिळणार असून निर्माते आणि दिग्दर्शकाला यावेळी गौरवण्यात येणार आहे. फिल्म फेस्टिवलमध्ये अक्की नागेश्वर रावचा चित्रपट 'देवदासु'चं विशेष स्क्रीनिंग होणार आहे. तसेच अमिताभ बच्चन यांचा पहिला 'सात हिंदुस्तानी' चित्रपट देखील या कार्यक्रमामध्ये दाखवल्या जाणार आहे. याशिवाय इफ्फी फिल्म फेस्टिवलसाठी सुभाष घई, गौहर खान, जयदीप अहलावत, संजय मिश्रा यासारखे कलाकार देखील गेले आहेत. दरम्यान इफ्फी चित्रपट महोत्सवाच्या पहिल्या दिवशी श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर अनेक चित्रपटांचे मोठे पोस्टर्स लागल्याचे दिसले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details