मुंबई - नाटककार कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी लिहिलेले 'संगीत मानापमान’ हे नाटक १९११ मध्ये रंगभूमीवर सादर करण्यात आलं. तसंच संगीत दिग्दर्शक ही संकल्पना याच नाटकापासून सुरु झाली असं जाणकार सांगतात. यातील संगीतानं आणि गाण्यांनी मराठी प्रेक्षकांना वेड लावलं आणि मराठी संगीत नाटकांचा प्रवास सुरु झाला. ‘संगीत मानापमान’ या नाटकात बालगंधर्वांनी काम केलं होतं. योगायोग म्हणजे पडद्यावर बालगंधर्व सादर करणारे सुबोध भावे हे आता या नाटकावर आधारित त्याच नावाचा सिनेमा घेऊन येताहेत. खाडिलकरांच्या ११४ वर्षांपूर्वीच्या गाजलेल्या नाटकावर आधारित या चित्रपटानं मराठी संगीत रंगभूमीच्या समृद्ध वारशाला नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला आहे.
सुबोध भावे यांनी याआधी ‘कट्यार काळजात घुसली' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं. 'संगीत मानापमान’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा त्यांनीच वाहिली आहे. अर्थातच हा संगीतप्रधान चित्रपट असून संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतत्रयी शंकर-एहसान-लॉय यांनी उचलली आहे. यात तब्ब्ल १४ गाणी असून त्यांना १८ आघाडीच्या गायकांचा आवाज लाभलाय, ज्यात सात राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक आहेत. मराठी प्रेक्षकांना अस्सल संगीताचा आनंद देणाऱ्या या चित्रपटातील गाण्यांना शंकर महादेवन, सोनू निगम, राहुल देशपांडे, महेश काळे, अवधूत गुप्ते, बेला शेंडे, आर्या आंबेकर, प्रियांका बर्वे आणि इतर प्रसिद्ध गायकांनी आवाज दिला आहे. संगीतकार शंकर महादेवन आपल्या भावना व्यक्त करीत म्हणाले की, "इतक्या प्रतिभावान गायकांसोबत काम करण्याचा हा अनुभव अविस्मरणीय आहे. समीर सामंत यांच्या शब्दांनी या गाण्यांना एक वेगळी उंची दिली आहे. आम्हाला खात्री आहे की प्रेक्षकांना ही संगीत यात्रा नक्कीच भावेल.”