मुंबई - अभिनेता विक्रांत मॅसीनं गेल्या वर्षी 12वी फेल या चित्रपटातून बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. या चित्रपटाला देशभरातील आणि जगभरातील प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळालं. 12वी फेल चित्रपटाला अनेक सेलिब्रिटी आणि दिग्दर्शक तसेच समीक्षकांनी पसंत केलं. या चित्रपटातून विक्रांत बॉलिवूडच्या मुख्य प्रवाहात आला आहे. आता या अभिनेत्याबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. खरंतर, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेता कॅब ड्रायव्हरबरोबर भाड्यावरून भांडताना दिसत आहे. या कॅब ड्रायव्हरनेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये विक्रांत कॅबमध्ये बसलेला दिसत आहे. त्यावेळी ड्रायव्हर म्हणतो, "साहेब, तुम्हाला दाखवलेलं भाडं द्यावं लागेल." याला उत्तर देताना विक्रांत ड्रायव्हरला म्हणतो, "आपण निघालो तेव्हा 450 रुपये ठरलं होतं, ते एवढं कसं वाढलं?" यावर ड्रायव्हर म्हणतो, ''याचा अर्थ तुम्ही भाडे देणार नाही. तेव्हा विक्रांत म्हणतो, भाऊ का द्यायचं सांग आणि ओरडतोयस कशाला?''
यानंतर अभिनेता विक्रांत आणि कॅब ड्रायव्हरमध्ये भाड्यावरून जोरदार वादावादी झाली. ठरलेल्या भाड्यापेक्षा अधिकचं भाडं अॅप दाखवत असल्यामुळे विक्रांत नाराज दिसला. तर आपल्या कॅबमध्ये विक्रांत मॅस्सी बसला आहे याची जाणीव झाल्यानं ड्रायव्हरने झालेला वाद मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीत केला. खरंतर यात ड्रायव्हर वाढलेल्या भाड्याचं समर्थन करताना दिसतोय आणि यात आपली चूक नसल्याचं सांगतो. विक्रांतही त्याला दोष देत नाही तर अॅप ऐनवेळी करत असलेल्या भाडेवाढीबद्दल आक्षेप घेताना दिसतोय.
सामान्य प्रवाशी म्हणून हा मुद्दा तितकाच महत्त्वाचा असल्याचं विक्रांत मॅस्सीचं म्हणणं कुणालाही पटण्यासारखं आहे. विक्रांत हा बॉलिवूड अभिनेता आहे, करोडोमध्ये कमवतोय त्यामुळे त्यानं जास्त घासाघीस न करता गुमान वाढलेलं भाडं द्यावं अशी अपेक्षा ड्रायव्हर करताना दिसतोय, तर माझे काय किंवा तुझे काय कष्टाचे पैसे अॅपच्या या मनमानीमुळे का भरायचे असा मुद्दा विक्रांतनं बोलून दाखवलाय, हे नागरिकांना पटण्यासारखंच आहे. या व्हिडिओची अद्याप पुष्टी झालेली नाही आणि ही अभिनेत्याची नवीन सामाजिक मोहीमही असू शकते.