नवी दिल्ली- भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)चे मावळते गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सोशल मीडियावरील एक भावुक पोस्ट केलीय. सध्या ती पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. शक्तिकांत दास यांनी त्यांना पाठिंबा दिल्याबद्दल सरकार, भागधारक अन् त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केलेत. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये शक्तिकांत दास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे RBI गव्हर्नरची भूमिका सोपवल्याबद्दल आणि त्यांच्या कार्यकाळात मार्गदर्शन अन् प्रोत्साहन दिल्याबद्दल आभार मानले. दास लिहितात, "मला RBI गव्हर्नर म्हणून देशाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आणि मार्गदर्शन, प्रोत्साहनाबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अत्यंत आभारी आहे. त्यांच्या विचारांचा मला खूप फायदा झाला आहे."
निर्मला सीतारामण यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त : तसेच शक्तिकांत दास यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केलीय आणि त्यांच्या कार्यकाळात मजबूत आर्थिक-मौद्रिक समन्वयावर प्रकाश टाकलाय. ते म्हणाले, "अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मला मार्गदर्शन आणि समर्थन केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. गेल्या सहा वर्षांमध्ये वित्तीय-मौद्रिक समन्वय सर्वोत्तम होता आणि आम्हाला अनेक आव्हानांवर मात करण्यास मदत मिळाली." शक्तिकांत दास यांनी आर्थिक, कृषी, सहकारी आणि सेवा उद्योगांसह विविध क्षेत्रातील भागधारकांकडून मिळालेल्या सूचना स्वीकारल्याचं सांगितलंय. तज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि उद्योग संस्थांचं धोरणनिर्मितीतील अमूल्य योगदानाबद्दल त्यांनी कौतुक केलंय.
आरबीआय एक विश्वासार्ह संस्था म्हणून उंचावत राहो : शक्तिकांत दास यांनी त्यांच्या पोस्टमध्ये आव्हाने हाताळल्याबद्दल RBI च्या टीमचं कौतुक केलंय. "संपूर्ण RBI टीमचे खूप खूप आभार. एकत्रितपणे आम्ही अभूतपूर्व जागतिक आव्हानांचा अपवादात्मक कठीण काळ यशस्वीपणे नेव्हिगेट केलाय, आरबीआय एक विश्वासार्ह संस्था म्हणून आणखी उंचावत राहो," असंही ते म्हणालेत. शक्तिकांत दास यांच्या निरोप समारंभात कोविड 19 महामारी आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचीही आठवण करून देण्यात आलीय.